पुणे : ऑडिटर पॅनेलमधून नाव वगळू नये यासाठी ५० हजारांची लाच मागून ३० हजार रुपये स्वीकारताना सहकारी संस्थेतील विशेष लेखापरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ललितकुमार भालचंद्र भावसार (वय ५५) असे या विशेष लेखापरीक्षक वर्ग २ अधिकाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून ते ऑडिटरही आहेत. सहकारी संस्थांच्या ऑडिटर पॅनेलमधून त्यांचे नाव वगळून नये, यासाठी ललितकुमार भावसारने त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. भावसार याने तडजोड करुन ३० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शविली. त्यानंतर सेंट्रल बिल्डिंग येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना भावसारला पकडले. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.