भावगीत ही धनदौलत
By Admin | Updated: June 13, 2017 04:27 IST2017-06-13T04:27:13+5:302017-06-13T04:27:13+5:30
भारावून टाकणे म्हणजे काय प्रकार असतो ते गजाननरावांमुळे अनुभवायला मिळाले. गजाननरावांचे गाणे पहिल्यांदा ऐकायला मिळाले ते माझ्या भावे हायस्कूलच्या

भावगीत ही धनदौलत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारावून टाकणे म्हणजे काय प्रकार असतो ते गजाननरावांमुळे अनुभवायला मिळाले. गजाननरावांचे गाणे पहिल्यांदा ऐकायला मिळाले ते माझ्या भावे हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात. शाळेत त्यांना शंभर रुपये मानधन दिले होते. मला वाटले होते, की दहा-पंधरा रुपये देतील. पुणेकर एका व्यक्तीला एवढे मानधन देतील, हा माझ्यासाठी धक्का होता. गजाननरावांनी दिलेला तो पहिला धक्का. त्यांचे गाणे ऐकणे हा काही वेगळाच आनंद होता. तो शब्दांत सांगता येत नाही, अशी भावना व्यक्त करून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गजाननराव वाटवे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मराठी भावगीताचे युगनिर्माते काव्यगायक गजाननराव वाटवे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते गजाननराव वाटवे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त अरुण नूलकर व कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे उपस्थित होते.
पुरंदरे म्हणाले, ‘‘गजाननराव, सुधीर फडके, पु. ल., गदिमा, शांता शेळके यांची प्रतिभा खूप अलौकिक होती. अलीकडच्या पिढीला किरकोळ गाणी ऐकण्याची सवय झाली आहे. चांगली गाणी काय असतात ते या प्रतिभावंताकडे पाहिले, की कळते. भाव काळजापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्य भावगीतांमध्ये आहे. भावगीते ही धनदौलत आहे.’’ ‘निरांजनातील वात’ हा वाटवे यांच्या रचनांचा कार्यक्रम प्रमोद रानडे, अपर्णा संत, कविता जांभेकर यांनी सादर केला.
वाटवेंच्या चाली अभ्यासाचा विषय
सत्काराला उत्तर देताना श्रीधर फडके म्हणाले, ‘‘गीतकार, संगीतकार गजाननराव वाटवेंनी माझे भावविश्व समृद्ध केले. असंख्य गोड गाणी आणि चाली त्यांनी दिल्या. त्यांच्या चाली हा अभ्यासाचा विषय आहे. शब्दांना नेमके स्वर कसे येतात, हा नेहमी संशोधनाचा विषय आहे. काळाच्या पुढच्या चाली त्यांनी दिल्या. माझ्यावर बाबुजींसह मागच्या पिढीतील सर्व कलाकारांचे संस्कार आहेत.’’