भोर : तालुक्यातील नीरा देवघर धरणात ४१ टक्के, तर भाटघर धरणात ७३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी नीरा देवघरमधून ७५० क्युसेक्सने, तर भाटघर धरणातून १ हजार ८९७ क्युसेक्सने पाण्याचा विर्सग सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत नीरा देवघर धरणात फक्त (३८ टक्केच) म्हणजे निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील सहा महिन्यांपासून पाणी सोडले जात आहे. यामुळे धरण भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे.भोर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले नीरा देवघर धरण पावसाळ्यात १०० टक्के भरले होत. वीजनिर्मितीसाठी धरणातून १६ आॅगस्टपासून ७५० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. आत्तापर्यंत ५९ टक्के पाणी खाली सोडण्यात आले आहे. यामुळे धरणात सध्या ४१ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर, भाटघर धरणातून वीजनिर्मितीसाठी मागील तीन महिन्यांपासून १८९७ क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. काही काळ विसर्ग बंद ठेवण्यात आला होता. धरणात सध्या ७३ टक्के पाणीसाठा आहे. नीरा देवघर धरणाच्या काठावरील दोन्ही बाजूंच्या अनेक गावांना धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. पाणी सोडण्याचा वेग असाच राहिल्यास येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे हा विसर्ग त्वरित थांबविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
भाटघर, नीरा देवघरचा पाणीसाठा निम्माच
By admin | Updated: February 1, 2015 23:55 IST