मराठी भाषासंवर्धनासाठी मिळणार भरघोस निधी
By Admin | Updated: March 18, 2015 00:44 IST2015-03-18T00:44:54+5:302015-03-18T00:44:54+5:30
मराठी भाषा दिनीच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात मराठी भाषासंवर्धन समितीसाठी करण्यात आलेली तरतूद ६२ लाखांवरून २८ लाखांवर आणण्याचा घाट घालण्यात आला होता.

मराठी भाषासंवर्धनासाठी मिळणार भरघोस निधी
पुणे : मराठी भाषा दिनीच सादर करण्यात आलेल्या महापालिकेच्या २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात मराठी भाषासंवर्धन समितीसाठी करण्यात आलेली तरतूद ६२ लाखांवरून २८ लाखांवर आणण्याचा घाट घालण्यात आला होता. हा निधी नजरचुकीने कमी झाला असून, तो पूर्ववत करण्याचे आश्वासन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी मंगळवारी अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान दिले.
निधी कपात केल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने ‘महापालिकेचाच खोडा : मराठी भाषासंवर्धनात पाऊल टालके मागे’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणली होती. त्याचा दाखला देत मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगून ही तरतूद पूर्ववत करण्याची मागणी केली होती.
मराठी भाषेच्या संवर्धन करण्याचा विडा उचलत महापालिकेच्या स्थायी समितीने २०१३-१४ मध्ये अंदाजपत्रकात कामगार विभागाच्या अंतर्गत भाषासंवर्धनासाठी तरतूद केली. त्याच वर्षी भाषासंवर्धन समितीचाही स्थापना करून त्यात ज्येष्ठ साहित्यिकांचा समावेश करण्यात आला.
या समितीला विश्रामबाग येथील झाशीची राणी शाळेत कार्यालय मिळाले खरे; पण त्यासाठी कामगार विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्गच नसल्याने आठवड्यातून एकदा या कार्यालयाचे कुलूप उघडण्यात येते, अशी सध्याची परिस्थिती आहे.
२०१४-१५मध्ये पालिकेच्या अंदाजपत्रकात भाषासंवर्धनासाठी तब्बल ६२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या वर्षी (२०१५-१६) त्या तरतुदीमध्ये कमालीची कपात करून हा निधी २८ लाखांवर आणण्यात आला.
याबाबत वागसकर यांनी मुख्य सभेत नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे मराठी भाषा दिनी हा प्रकार करणे योग्य नसल्याचे सांगत या प्रकराचा निषेध केला. तसेच, ही तरतूद पूर्ववत करण्याची मागणी केली. त्यानंतर आपल्या भाषणात कर्णेगुरुजी यांनी हा प्रकार नजरचुकीने झाल्याची कबुली दिली. ही चूक दुरुस्त करून या समितीसाठी पूर्वीप्रमाणेच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)