रेमडेसिविर इंजेक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:43+5:302021-04-11T04:11:43+5:30
पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापराबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचे पालन करता सरसकट काही खासगी रुग्णालयांकडून विनाकारण इंजेक्शनची मागणी ...

रेमडेसिविर इंजेक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक
पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापराबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचे पालन करता सरसकट काही खासगी रुग्णालयांकडून विनाकारण इंजेक्शनची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली जात आहे. इंजेक्शनचा योग्य प्रकारे वापर होतो आहे की नाही हे तपासण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांना कोणत्या काळात इंजेक्शन दिले पाहिजे याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत गेले. यामध्ये गंभीर रूग्णांची संख्याही वाढली आहे. आजमितीस शहरात ५० हजार सक्रिय रुग्ण आहेत. ऑक्सिजन पातळी कमी झाली आणि एचआरसीटी स्कोअर कमी झालेल्या रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचे पाच डोस देण्यात येतात. सद्यःस्थितीत खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविरची मागणी केली जात आहे. तुलनेत या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी धावपळ सुरू आहे. अनेक मेडिकल बाहेर रांगा लागू लागल्या आहेत. इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे.
परंतु, काही ठिकाणी रुग्णांची प्रकृती चांगली असतानाही इंजेक्शन मागविली जात असल्याने असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. काही रुग्णालये आवश्यकता नसताना इंजेक्शनची मागणी करीत आहेत. त्यामुळे तपासणी करण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात येणार आहे.
-----
रेमडेसिविर कधी देतात?
१. ऑक्सिजन पातळी कमी झाली असल्यास.
२. रुग्णाला पहिल्या आठवड्यातच हे इंजेक्शन दिले तर त्याचा योग्य परिणाम दिसतो.
३. एचआरसीटी स्कोअर साधारण १० पेक्षा पुढे गेल्यानंतर.
-----
आठ दिवसानंतर इंजेक्शन दिल्यास उपयोग होत नाही
आठवड्यानंतरही गंभीर असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन दिले तरी त्याचा उपयोग होत नाही. परंतु, काही रुग्णालये रुग्णांचा एचआरसीटी स्कोअर तीनपर्यंत असला तरीदेखील इंजेक्शन मागवित आहेत. रुग्ण दाखल झाल्यानंतर एक-दोन दिवसांतच इंजेक्शन दिली जात असल्याच्या तक्रारी असल्याचे डॉ. वावरे यांनी सांगितले.