केंद्राच्या ‘पीएफ’ धोरणाविरूद्ध भामसंचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:03+5:302021-03-17T04:13:03+5:30
पुणे: कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ करण्यासाठी समिती स्थापन करावी या मागणीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष ...

केंद्राच्या ‘पीएफ’ धोरणाविरूद्ध भामसंचे आंदोलन
पुणे: कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ करण्यासाठी समिती स्थापन करावी या मागणीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्यावरून भारतीय मजदूर संघाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने केली. विभागीय आयुक्त अरूणकुमार यांना निवेदन देण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या पीएफची काही रक्कम त्याला निवृत्तीनंतर देऊन काही हिस्सा सरकार स्वत:जवळ ठेवून घेते. त्यातून ६० वर्षे वयावरील कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन म्हणून दरमहा किमान हजार रूपये दिले जातात. या रकमेत गेल्या अनेक वर्षांत फरक पडलेला नाही. या रकमेत वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करत असल्याची माहिती संघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद यांनी दिली.
निवृत्ती वेतन किमान ५ हजार रूपये करावे, त्यात महागाई भत्त्याचा समावेश करावा, कामगारांमध्ये भेद करू नये, हे सर्व निकष ठरवण्यासाठी एका स्वतंत्र समितीची स्थापना करावी या मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. आंदोलनात विस्वाद यांच्यासह चिटणीस जालिंदर कांबळे, सचिन मेंगाळे, अर्जुन चव्हाण, उमेश विस्वाद, विवेक ठकार, अजेंद्र जोशी, वासंती तुम्मा, विजयालक्ष्मी येमुल आदी सहभागी झाले होते.