साखर उद्योगासाठी सर्वतोपरी प्रयत्न
By Admin | Updated: October 28, 2015 01:20 IST2015-10-28T01:20:38+5:302015-10-28T01:20:38+5:30
कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

साखर उद्योगासाठी सर्वतोपरी प्रयत्न
शिरगाव : कठीण अवस्थेतून जात असलेल्या राज्यातील साखर उद्योग वाचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न पुरवठा व पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
कासारसाई- दारुंब्रे (ता. मावळ) येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या १८व्या गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी श्री संत तुकाराममहाराज संस्थान, देहूचे अध्यक्ष हभप शांताराममहाराज मोरे यांच्या आधिपत्याखाली पालकमंत्री बापट यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माजी खासदार अशोक मोहळ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे, श्रीमती रूपलेखा ढोरे, सविता दगडे, कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, अनिल लोखंडे, चेतन भुजबळ, माऊली शिंदे, अंकुश आंबेकर, पांडुरंग ठाकर, धैर्यशील ढमाले, चंद्रकांत लोहिरे, स्वाती भेगडे, कुंद विनोदे, मुख्य कार्यकारी संचालक एन. पी. दुर्वे, कार्यकारी संचालक साहेबराव पठारे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याच्या फायद्यासाठी प्रदीर्घ काळासाठी योजना राबविण्यासाठी सरकार कटिबद्ध राहील. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनासारख्या पाणी बचत करणाऱ्या पद्धतीचा वापर करावा, शासन ठिबक सिंचनासाठी देण्यात येणारे अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी मंत्री पाटील म्हणाले की, साखर उद्योग ही महाराष्ट्राची सर्वांत मोठी ओळख असून, ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी साखर कारखान्यांची मोठी भूमिका आहे.
शिवतरे म्हणाले की, कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी इस्राईलचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. (प्रतिनिधी)