छुप्या पद्धतीने बैलगाडा शर्यत
By Admin | Updated: May 8, 2017 02:23 IST2017-05-08T02:23:04+5:302017-05-08T02:23:04+5:30
तरडोलीनजीक पवारवाडी येथे रविवारी (दि. ७) छुप्या पद्धतीने बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते

छुप्या पद्धतीने बैलगाडा शर्यत
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती/ वडगाव निंबाळकर : तरडोलीनजीक पवारवाडी येथे रविवारी (दि. ७) छुप्या पद्धतीने बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी परिसरातून काही गाडीवान बैलांसहित आला होते.
मात्र, वडगाव निंबाळकर पोलिसांनी माहिती मिळताच संबंधित ठिकाणी धाव घेतली. या वेळी पाच गाडीवानांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लेखी घेतले आहे. तर काही गाडीवानांनी धूम ठोकली असल्याचा प्रकार आज घडला.
न्यायालयाची बंदी असताना कुठलीही परवानगी न घेता छुप्या पद्धतीने बैलगाडी शर्यतीचे आयोजन तरडोलीनजीक पवारवाडी येथील ओढ्याकाठी करण्यात आले होते. शर्यती सुरू होण्यासाठी काही वेळ बाकी असताना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी १५-२० पोलिसांसहित संबंधित ठिकाणी धाव घेतली.
या वेळी पाच गाडीमालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून परवानगीशिवाय परत येथे शर्यतीस येणार नसल्याचे लेखी लिहून घेतले आहे. यासंदर्भात वडगाव निंबाळकर पोलिसांनी अज्ञात आयोजकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.