बैलगाडामालकांचे आळंदीत ‘एल्गार’
By Admin | Updated: March 14, 2015 06:15 IST2015-03-14T06:15:44+5:302015-03-14T06:15:44+5:30
अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला .

बैलगाडामालकांचे आळंदीत ‘एल्गार’
शेलपिंपळगाव : अधिवेशनात केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली नाही, तर दिल्लीत वन व पर्यावरण भवनासमोरच उपोषण करू, असा इशारा बैलगाडामालकांनी शुक्रवारी दिला .
शर्यतीवरी बंदी उठविण्यासाठी बैलगाडामालक व गाडाशौकिनानी तीर्थक्षेत्र आळंदी येथे एकदिवसीय सामूहिक उपोषण केले. महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपोषणासाठी पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, राजगड, अलिबाग, मुरबाड आदी ठिकाणांहून बैलगाडामालक आळंदीत आले होते. शुक्रवारी पहाटे श्रीज्ञानेश्वर माउलींच्या समाधीला अभिषेक घालण्यात आला. समाधीचे दर्शन घेऊन सर्व उपोषणकर्त्यांनी उपोषणास सुरुवात केली. याप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, आमदार महेश लांडगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
‘बंदी’मुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रांचे महत्त्व घटत चालले असून, शर्यतींच्या बैलांची किंमतही कमी होत आहे. विविध देव-देवतांच्या उत्सवाच्या निमित्त आयोजित या शर्यतींवर अवलंबून असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय डबघाईला आले आहेत, असे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. ‘बैलगाडा शर्यत बंदी’च्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला फटका
बसत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कायद्यात बदल करून शर्यती सुरू करू, असे सूतोवाच केले होते. मात्र, याला वर्ष उलटून गेले तरीही ठोस निर्णय घेतला नसल्याने गाडामालकांनी नाराजी व्यक्त केली. आळंदी, चाकण पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास पसायदानाने लाक्षणिक सामूहिक उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)