ब्राह्मण महासंघाचे आंदोलन मागे
By Admin | Updated: March 15, 2017 03:32 IST2017-03-15T03:32:09+5:302017-03-15T03:32:09+5:30
ब्राह्मण समाजविरोधातील वादग्रस्त विधानाने टिकेचे धनी झालेले सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर

ब्राह्मण महासंघाचे आंदोलन मागे
पुणे : ब्राह्मण समाजविरोधातील वादग्रस्त विधानाने टिकेचे धनी झालेले सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर, अखिल भारतीय महासंघाने कांबळे यांच्या विरोधातील आंदोलन मागे घेतले.
लातूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना कांबळे यांनी ‘कोणालाही घाबरायला मी ब्राह्मण नाही’ असे वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर नेहरू स्टेडियम येथील कांबळे यांच्या संपर्क कार्यालयाच्या समोर मंगळवारी दुपारी चार वाजता अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात येत होते. त्यानुसार दुपारी त्यांच्या कार्यालयाजवळ कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांनी संपर्क कार्यालयापासून काही अंतरावरच रोखले व काही पदाधिकाऱ्यांना आत जाण्याची परवानगी दिली.
थोड्यावेळाने दिलीप कांबळे कार्यकर्त्यांच्या समोर आले. त्यांनी लातूरमधील त्यांच्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँगेसचे आमदार रमेश कदम यांचा पाचशे कोटींचा घोटाळा उघडकीस आला व त्यांच्या संपत्तीवर जप्ती आली. त्यांच्या समर्थकांनी माझ्या सभांमध्ये घोषणाबाजी करीत गोंधळ घातला.
मात्र, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात त्यांना काही करता आले नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना कडक शब्दांत इशारा देण्यासाठी मी बोललो. मला फक्त एवढेच सांगायचे होते की, ब्राह्मण समाज कधीही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत नाही, तो समंजसपणे प्रत्येक घटनेला सामोरा जातो असा मी नाही, असे सांगण्याचा माझा मूळ उद्देश होता. परंतु, तरीही यातून कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची जाहीर माफी मागत हा वाद संपल्याचे जाहीर करतो.’ या वेळी भाजपाचे नगरसेवक धीरज घाटे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद जवे व पदाधिकारी, कार्येकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)