प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST2021-05-19T04:11:58+5:302021-05-19T04:11:58+5:30
पुणे : भिलारच्या धर्तीवरच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका गावात पुस्तकांचे गाव उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा गौरव ...

प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव उभारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
पुणे : भिलारच्या धर्तीवरच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका गावात पुस्तकांचे गाव उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा गौरव दिनी केल्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी कोणत्या जिल्ह्यात ‘पुस्तकांचं गाव’ उभारता येईल याबाबत महाराष्ट्रातील प्रमुख प्रकाशक, एमटीडीसी, नामवंत साहित्यिक, विद्यापीठांचे मराठी विभागप्रमुख यांना राज्य मराठी विकास संस्थेकडून पत्र पाठविण्यात आली आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. आजमितीला सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, विदर्भ या जिल्हयांमधील एका गावाची पाहणी करण्यात आली असून, ग्रामस्थांशी प्राथमिक चर्चा देखील करण्यात आली आहे. परंतु, कोरोनामुळे राज्यात संचारबंदीचे नियम लागू असल्याने सध्या ही प्रक्रिया थांबली असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील भिलार गावात पुस्तकांचे गाव उभारण्यात आले. या अनोख्या पुस्तकाच्या गावाला देशविदेशातून हजारो पर्यटकांनी भेट द्यायला सुरुवात केली आणि या पुस्तकाच्या गावाने वाचनसंस्कृती रुजविली. संस्थेचा हा प्रकल्प साहित्यविश्वात कौतुकास पात्र ठरला. याच धर्तीवर आता लोकसहभागातून प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचं गाव उभारण्यासाठी संस्थेच्या कामाला सुरू झाली आहे.
-------------------------
संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या वतीने हा प्रकल्प आकारणीस येत आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील एका गावात ‘पुस्तकांचं गाव’ या प्रकल्पाला आम्ही सुरुवात केली आहे. गावाची पाहणी आणि ग्रामस्थांशी प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. आमच्याकडे वाचनालय, एमटीडीसी, प्रकाशन संस्थांकडून जवळपास १० टक्के शिफारशी आल्या आहेत. त्यांची या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पुढाकार घेण्याची इच्छा आहे. मात्र त्याची छाननी आणि त्यानंतर वर्गवारी करून अंतिम प्रक्रियेला सुरूवात होईल. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यावर त्याची रचना कळेल. टप्प्याटप्प्याने त्याचे काम होणार आहे. कोरोनामुळे संचारबंदी असल्याने हा प्रक्रिया थांबली आहे. सर्वकाही ठीक झाले तर वेगाने कामाला सुरुवात करू. आता तर त्याच्या रचनेबाबत काम सुरू आहे.
---------------------------------------