प्रभागात जुळवाजुळव सुरू
By Admin | Updated: October 10, 2016 01:36 IST2016-10-10T01:36:24+5:302016-10-10T01:36:24+5:30
महापालिकेची प्रभागरचना शुक्रवारी झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळण्यापूर्वीच थेट प्रचाराला सुरुवात करण्याची चाचपणी करण्यात येत

प्रभागात जुळवाजुळव सुरू
पुणे : महापालिकेची प्रभागरचना शुक्रवारी झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळण्यापूर्वीच थेट प्रचाराला सुरुवात करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. चार सदस्यीय प्रभाग मोठा असल्याने खूप कमी वेळात त्यांना घरा-घरापर्यंत पोहोचण्याची कसोटी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे नव्या भागातील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, बैठका, सोशल मीडियावरील प्रचार यांना वेग आला आहे.
आगामी महापालिकेची निवडणूक मार्च २०१७ मध्ये होणार आहे, त्यासाठी अवघा ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. जानेवारी महिन्यामध्ये निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता जाहीर करून निवडणुका कार्यक्रम घोषित केला जाणे अपेक्षित आहे. यंदा पहिल्यांदाच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका पार पडत आहेत. एक प्रभाग हा ७० ते ८५ हजार लोकसंख्येचा आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचना आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान इच्छुक उमेदवारांसमोर असणार आहे.
प्रभागरचनेचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वी निवडणुकीची तयारी करण्यामध्ये उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या. इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवात मंडळांवर मोठ्या प्रमाणात देणग्यांची खैरात केली. मात्र संबंधित गणेश मंडळाचे कार्यकर्ते नवीन प्रभागात असणार का, अशी धाकधूक त्यांना वाटत होती. अखेर शुक्रवारी प्रभागरचनेवरचा पडदा उठला. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार व निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी नवीन प्रभागरचनेचा आराखडा, प्रभागांच्या चतु:सीमा व नकाशे प्रसिद्ध केले. काहींसाठी प्रभागरचना सुखद ठरली तर काहींना त्यामुळे मोठे हादरे बसले आहेत. या धक्क्यांमधून सावरत आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
उमेदवारांनी सर्वांत पहिल्यांदा नव्याने समाविष्ट झालेल्या भागांमध्ये भेटीगाठी देण्यावर भर दिला आहे. नव्या भागात कार्यरत असलेले पक्षाचे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करणे, त्या भागातील नातेवाई, मित्र परिवार यांना प्रचारासाठी तयार करणे, बैठका घेणे यावर उमेदवार भर देत आहेत. सकाळच्या मॉर्निंग वॉकपासून उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात होत आहे. विद्यमान नगरसेवकांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. बहुतांश विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी फिक्स असल्याने ते जोरदारपणे प्रचाराला लागले आहेत. तिकीट मिळेल की नाही याची धाकधूक मनात ठेवून अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वीच प्रचारात रंग भरू लागला आहे. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावर भर-
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप ग्रुप या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न केले आहेत. राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर वाढवावा यासाठी विशेष शिबिरे घेण्यात आली. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या प्रचारासाठी विशेष नेमणुका केल्या आहेत.
फ्लेक्सबाजीला उधाण-
सण, उत्सव, कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरामध्ये अधिकृत-अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग उभे राहणे नवीन नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला आणखीनच उधाण आले आहे. इच्छुक उमेदवारांचे वाढदिवस, कौटुंबिक समारंभ दणक्यात पार पडू लागले आहेत.
मतदार नोंदणीवर जोर-
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी मोहीम येत्या १४ आॅक्टोबरपर्यंत राबविली जाणार आहे. जास्तीत जास्त नवमतदारांचे मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यावर आजी-माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार यांच्याकडून भर दिला जात आहे. त्यांना अर्ज भरण्यापासून सर्व प्रकारची मदत केली जात आहे.