बारामती उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत अंथरल्या खाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:56+5:302021-04-01T04:12:56+5:30
कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या मुख्य उद्देशाने बारामतीत एक शासकीय मेडिकल कॉलेज, तीन नटराज असे चार कोविड केअर सेंटर, रुई ...

बारामती उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत अंथरल्या खाटा
कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या मुख्य उद्देशाने बारामतीत एक शासकीय मेडिकल कॉलेज, तीन नटराज असे चार कोविड केअर सेंटर, रुई आणि सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तर खाजगी ‘बारामती हॉस्पिटल’ प्रशासनाने अधिग्रहित केलेले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र बारामतीत १५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने बेडचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण यांच्या टीमने तातडीने हालचाली करुन साठ बेडस, साठ बेडशीट, गाद्या यांची उपलब्धता करुन देत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात तात्पुरता पोर्चंमध्ये कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे.
बारामतीतील कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक जण सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. आज रुग्णालयातील सर्वच बेड रुग्णांनी व्यापलेले असताना नवीन अचानकच जवळपास साठ रुग्ण उपचारासाठी विनंती करत असल्याने वैद्यकीय प्रशासनाची कोंडी झाली होती. ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही, मात्र ज्यांना रेमडीसेव्हर इंजेक्शनची गरज आहे, अशा रुग्णांना कसेही करुन तात्पुरती व्यवस्था उभारुन सामावून घेण्याचा निर्णय डॉ. सदानंद काळे, किरण गुजर व सहकाऱ्यांनी घेतला असल्याने रुग्णांना उपचार मिळाले आहे.
गृहविलगीकरणास परवानगी द्यावी
रुग्णांची वाढती संख्या आता प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनू लागली आहे. गृहविलगीकरणास परवानगी देण्याची गरज आहे. संस्थात्मक क्वारंटईन नको, अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे होते, त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. : डॉ. सदानंद काळे सिल्व्हर वैद्यकीय अधीक्षक