भाव नसल्याने कांदा बराखीत पडून
By Admin | Updated: May 11, 2017 04:15 IST2017-05-11T04:15:30+5:302017-05-11T04:15:30+5:30
शिरापूरच्या (ता. दौंड) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा बराखीत ठेवणे पसंत

भाव नसल्याने कांदा बराखीत पडून
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजे : शिरापूरच्या (ता. दौंड) परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा बराखीत ठेवणे पसंत केले आहे. तर काही शेतकरी पावसाळ्यापूर्वीच कांदा बराखीची डागडुजी करून कांदा बराखीमध्ये सुव्यवस्थित ठेवण्याच्या तयारीला लागले आहेत.
सध्या परिस्थितीत कांदा पिकाला एकरी ४0 ते ४५ हजार रुपये खर्च येत आहे. त्यामध्ये शेतीची मशागत करुन कांदा पिकाच्या लागणीसाठी सरी काढणे, कांदा लागवड, खुरपण, रासायनिक खते-औषधे, औषध फवारणी, कांदा काढणी, शेतातून काढलेला कांदा वाहतूक मार्केटपर्यंत करणे इत्यादीसाठी या पिकाला खर्च येत आहे. परंतु आत्ताच्या चालू बाजारभावाप्रमाणे कांदा विक्री केल्यास शेतकऱ्याला तोटा येत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी विकण्याऐवजी कांदा बराखीत टाकणे पसंत केले आहे. चालू वर्षी कांद्याला बाजारभाव चांगला राहील. कांद्याची निर्यात चालू झाली तर बाजारभावात वाढ होईल व खर्च वजा जाता चार पैसे शिल्लक राहतील, अशी आशा येथील शेतकऱ्यांना वाटते.