सरपंच महिलेला मारहाण ही गोष्ट चीड आणणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST2021-09-05T04:16:03+5:302021-09-05T04:16:03+5:30
कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मारहाण केली ...

सरपंच महिलेला मारहाण ही गोष्ट चीड आणणारी
कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना लसीकरण केंद्रावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे. ही गोष्ट धक्कादायक व चीड आणणारी आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर दिली आहे. या संदर्भातला एक व्हिडीओच वाघ यांनी ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारवर टीका केली आहे.
लसीकरणाच्या श्रेयवादावरून काल कदमवाकवस्ती येथे सरपंच गौरी गायकवाड गटाची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली. तसेच यात सरपंच गौरी गायकवाड यांनाही मारहाण झाली आहे. याबाबत वाघ यांनी गायकवाड यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ ट्वीटवर पोस्ट केला आहे. त्यावरून त्यांनी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे.
त्या म्हणाल्या, कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा. गृहखाते ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ करणे त्यांना ॲट्रॉसिटीच्या धमक्या देणे महिला सरपंचाला मारहाण करणे याचे लायसन्स दिले आहे का? मुख्यमंत्री महोदय हे धक्कादायक, चीड आणणारे आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारे आहे, असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.