‘व्हर्च्युअल’ विद्वेषापासून सावध राहावे

By Admin | Updated: March 28, 2017 23:50 IST2017-03-28T23:50:43+5:302017-03-28T23:50:43+5:30

देशाची सुरक्षा ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची तेवढीच जबाबदारी असल्याचे मत

Be wary of 'virtual' mischief | ‘व्हर्च्युअल’ विद्वेषापासून सावध राहावे

‘व्हर्च्युअल’ विद्वेषापासून सावध राहावे

कोणत्याही धर्मामध्ये दहशतवादाची शिकवण देण्यात येत नाही. मानवी मूल्ये जतन करण्यासाठी धर्माची स्थापना झालेली असते. मात्र, काही प्रवृत्ती धर्माच्या आधारे समाजामध्ये विद्वेष पसरवतात. तरुणांना वैचारिक जाळ्यात अडकवून कट्टरतावादाकडे वळवतात. दहशतवादाकडे आकर्षित होणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. संयमाने आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. देशाची सुरक्षा ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची तेवढीच जबाबदारी असल्याचे मत दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.
पुणे : ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून धार्मिक कट्टरतावाद पसरवला जात आहे. याला कोणत्याही धर्माचा अपवाद राहिलेला नाही. या व्हर्च्युअल विद्वेषापासून नागरिकांनी सावध राहणे आणि यंत्रणांना वेळीच सावध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
दहशतवाद आणि नक्षलवाद ही आपल्यापुढील मोठी आव्हाने आहेत. सुशिक्षित तरुणांना धर्माचा चुकीचा अर्थ सांगितला जात आहे. त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्याचे काम सुरू आहे. दहशतवादविरोधी पथकाने अशा प्रकारे कट्टरतावादाकडे झुकत चाललेल्या तरुणांना परावृत्त करण्याचे कामही हाती घेतले आहे. त्यासाठी त्या त्या धर्मातील धर्मगुरूंची मदत घेतली जाते. या तरुणांवर गुन्हे दाखल न करता त्यांना समजावून सांगून पुन्हा प्रवाहामध्ये आणले जात आहे. गेल्या काही दिवसांत इसिसमध्ये जाऊ पाहणाऱ्यांची संख्या वाढली होती. मात्र, त्यांचे समुपदेशन करून परावृत्त करण्यात यश आले आहे.
इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेकडून निर्माण झालेले वैचारिक परिणाम अधिक घातक आहेत. ‘लोन वोल्फ’ रोखणे हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. पुण्यातली एक सोळा वर्षीय तरुणी इसिसकडे आकर्षित झाली होती. तिचे मन परिवर्तन घडवून आणण्यात यश आले. पुण्यामध्ये मुस्लिम मौलवींच्या मोठ्या स्तरावर बैठका घेण्यात आल्या. यासोबतच शहराच्या विविध भागांत जनजागृती सभा घेऊन तरुणांना दहशतवादाचे खरे स्वरूप समजावून सांगण्यात आले. एटीएसकडून महाविद्यालयांमध्येही व्याख्यानांचे आयोजन करुन तरुणांना याविषयी जागरूक करण्यात येत आहे.
देशात आणि जगभरात घडणाऱ्या दहशतवादी कारवायांचा अभ्यास करण्यात येतो. त्यांच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास करून त्याला कशा प्रकारे रोखता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतात.
कोणत्याही प्रकारचा ‘अलर्ट’ हा नेहमी गांभीर्याने घेतला जातो. पोलिसांकडून कधीही राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केला जात नाही. दहशतवाद या विषयामध्ये अधिक ‘स्पेशलायझेशन’ येण्याची आवश्यकता नक्कीच आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर शासनाने पोलिसांना अधिक चांगली शस्त्रास्त्रे, साहित्य उपलब्ध करून दिले आहे. चर्चासत्रे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोलिसांना दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच असे हल्ले रोखण्यासाठी तयार करण्यात येते.
सोशल मीडिया हे देशविघातक प्रवृत्तींच्या हातामध्ये लागलेले एकप्रकारचे हत्यारच आहे.
कोणीही विदेशात बसून आपल्याकडे दंगली भडकावू शकतो. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट पाहून नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यानंतर जमाव हिंसक होत जातो. वास्तविक या प्रवृत्तींना जे हवे आहे तेच आपण करतो. अशा पोस्टपासून सावध राहणे, त्याची माहिती पोलिसांना आणि अन्य यंत्रणांना देणे, वेळीच अशा पोस्ट डिलीट करणे, त्याला प्रतिवाद करणे आवश्यक आहे. यामध्ये नागरिकांनी पुढाकार घेतला तर अनेक अनुचित घटना टाळता येतील.
अलीकडच्या काळात शहरी भागांमध्ये पाय पसरू पाहात असलेला नक्षलवाद आणि त्याची विचारसरणी ही चिंतेची बाब आहे. आर्थिक दुर्बल घटकांना हेरुन त्यांच्या मनात व्यवस्थेविषयी राग निर्माण करुन तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
पुणे एटीएसने यासंदर्भात काही कारवायाही पुण्यामध्ये केल्या आहेत. पोलिसांना नागरिकांनीही माहिती दिल्यास अशा अनेक घटना टाळता येतील.

Web Title: Be wary of 'virtual' mischief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.