अपयशाला धीराने सामोरे जा!

By Admin | Updated: May 26, 2015 23:20 IST2015-05-26T23:20:38+5:302015-05-26T23:20:38+5:30

परीक्षा म्हटले की यश-अपयश आलेच. यश मिळाल्यानंतर जल्लोष करणे साहजिक आहे. परंतु, परीक्षेत अपयश आल्याने खचून जाऊ नका.

Be patient with failure! | अपयशाला धीराने सामोरे जा!

अपयशाला धीराने सामोरे जा!

पुणे : परीक्षा म्हटले की यश-अपयश आलेच. यश मिळाल्यानंतर जल्लोष करणे साहजिक आहे. परंतु, परीक्षेत अपयश आल्याने खचून जाऊ नका. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना धीर द्यायला हवा. तसेच विद्यार्थ्यांनीही खचून न जाता निकालाला सामोरे जावे, मनातील विचारांना मोकळी वाट करून द्यावी, असे मत समुपदेशक, शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मंडळाचा परीक्षेचा पॅटर्न ८०:२० आहे. त्यामुळे यश मिळविण्याच्या जिद्दीने वर्षभर अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना २० पैकी अधिकाधिक गुण दिले जातात. त्यामुळे उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ १५ ते २० गुणांची आवश्यकता भासते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी ग्रेस गुण दिले जातात. तसेच एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर क्लास इम्प्रुमेंटची संधी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता हातात मिळालेला निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा.
राज्य शिक्षण मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेले समुपदेशक बी. डी. गरुड म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांवर दबाव आणू नये. तसेच अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून मुलावर ओरडू नये. करिअर करण्यासाठी डॉक्टर आणि इंजिनिअर या दोनच गोष्टी नाहीत. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवावा. (प्रतिनिधी)

आवडीचे क्षेत्र निवडावे
विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडले तर त्याचा फायदा होऊ शकतो. प्रत्येकाने आपल्या बौद्धिक क्षमतेची चाचणी करून करिअरसाठी दिशा ठरविली तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतील. त्यासाठी पालकांनी मुलांवर दबाव न टाकता त्यांना क्षेत्र निवडीसाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे.

मानसिक तणाव आणि औषधे
मुले टेन्शनमुळे डिप्रेशनमध्ये जातात. अशा वेळी त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांकडे घेऊन जाणे गरजेचे असते. तणावाखाली असलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचा उपयोग करता येऊ शकतो.

पालकांनी मुलांवर सतत अभ्यासाचे दडपण टाकू नये. इतर मुलांशी तुलना न करता त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधावा. एका अपयशाने मुलांच्या भविष्याची दारे बंद होत नाहीत. आपल्या चुका सुधारणाची संधी मुलांनी स्वत:च घ्यायला हवी. डिप्रेशनमध्ये न जाता, स्वत:ला दोष न देता विद्यार्थ्यांनी पुन्हा यशाला गवसणी घालण्यासाठी समर्थपणे उभे राहिले पाहिजे.
- डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

मुलांनी केलेल्या श्रमाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल. परंतु ज्या मुलांना अपयश, कमी मार्क्स मिळाले, त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे. जरी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. तसेच पुढील ध्येयासाठी प्रयत्न करावे. मुलांना यश न मिळाल्यास पालकांनी त्यांना समजावून घ्यावे आणि पुढील करिअरसाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे.
- डॉ. रवींद्रसिंह परदेशी, प्राचार्य, फर्ग्युसन महाविदयालय

मुलांना गुण-दोषासहित स्वीकारणे
पालकांनी मुलांवर दबाव न टाकता त्यांच्या गुण-दोषासहित स्वीकारले पाहिजे. मुलांना आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांच्या आधाराची गरज असते. मुलांना त्यांच्या योग्यतेनुसार, क्षमतेनुसार व आवडीनुसार क्षेत्र निवडण्यासाठी स्वातंत्र्य द्यावे.
- बी. डी. गरुड, समुपदेशक, पुणे विभागीय मंडळ

राज्य मंडळाने निकालाच्या माहितीबाबत समुपदेशकांची नियुक्ती केली असून, विद्यार्थ्यांनी बी. डी. गरुड यांना ८६००५२५९०८, तसेच एस. एल. कानडे यांना ९०२८०२७३५३ दूरध्वनीवर संपर्क साधावा.

Web Title: Be patient with failure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.