पाणीपुरवठ्याबाबत योग्य काळजी घ्या
By Admin | Updated: June 30, 2015 23:07 IST2015-06-30T23:07:17+5:302015-06-30T23:07:17+5:30
पुरंदरमध्ये मागील आठवड्यात पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा आहे. पावसामुळे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्ध करूनच पाणीपुरवठा करण्यात यावा

पाणीपुरवठ्याबाबत योग्य काळजी घ्या
सासवड : पुरंदरमध्ये मागील आठवड्यात पाऊस झाल्याने पाणीसाठा पुरेसा आहे. पावसामुळे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्ध करूनच पाणीपुरवठा करण्यात यावा, ज्या विहिरींचे पाणी घ्यावयाचे आहे त्या विहिरीत औषधे टाकण्यात यावीत, आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा ठेवावा तसेच आरोग्य पथके तयार करावीत, पुरवठा विभागाने दर वर्षीप्रमाणे गॅस व रॉकेल पुरवठा करावा, विद्युत वितरण कंपनीने उघड्या फ्युजबॉक्सची दुरुस्ती करावी, पोलिसांनी वाहतूक व्यवस्था योग्य ठेवावी, त्याचे नियोजन करावे यांसारख्या सूचना प्रशासनाने पालखीसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १२ जुलै रोजी पुरंदर तालुक्यात येत आहे. हा सोहळा सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असणार आहे.
याबरोबरच जेजुरी, वाल्हे आदी ठिकाणीही पालखीचा मुक्काम असणार आहे. या सोहळ्यासाठी तालुक्यात योग्य व्यवस्था ठेवण्याबाबत पुरंदर -दौंडचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली सासवड तहसील कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी पोलीस विभाग, पाटबंधारे विभाग, सासवड-जेजुरी
नगरपालिका, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, महावितरण, एसटी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, तहसीलदार संजय पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)