मूलभूत शिक्षणात तडजोड नको
By Admin | Updated: February 10, 2017 02:54 IST2017-02-10T02:54:31+5:302017-02-10T02:54:31+5:30
पुणे विद्यापीठाची स्थापना १0 फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. त्या वेळी विद्यापीठाचा विस्तार १२ जिल्ह्यांत होता. सध्या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पुणे

मूलभूत शिक्षणात तडजोड नको
पुणे विद्यापीठाची स्थापना १0 फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. त्या वेळी विद्यापीठाचा विस्तार १२ जिल्ह्यांत होता. सध्या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात असून, विद्यापीठ आज आपला ६८वा वर्धापन दिन साजरा करत आहे. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. एम. आर. जयकर यांच्यापासून डॉ.आर. पी. परांजपे, डी.जी. कर्वे, महामहोपाध्याय द. वा. पोतदार, काकासाहेब गाडगीळ, डी. आर. गाडगीळ, डॉ. एच. व्ही. पाटसकर यांनी विद्यापीठाच्या प्रेमापोटी काम केले. १९७0पासून राज्य शासनाने पूर्ण वेळ वेतनावर काम करणारे कुलगुरू म्हणून डॉ.बी.पी. आपटे यांची नियुक्ती केली. त्यानंतर डॉ.जी.एस. महाजनी, प्राचार्य डी.ए. दाभोळकर यांची कुलगुरुपदी नियुक्ती झाली. दरम्यानच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आणि विद्यापीठाशी प्रेम असणारे अनेक प्राध्यापक व प्राचार्य विद्यापीठात येण्यास सुरुवात झाली.
१९७८मध्ये कुलगुरू निवडीच्या नवीन प्रक्रियेतून याच विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. राम ताकवले यांची कुलगुरुपदी निवड झाली. तरुण वयातच त्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळाली. विद्यापीठाला गतिशीलतेने पुढे घेऊन जाण्याची प्रकृती त्यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये गुंतवली आणि राबवली. पुढे वि.ग. भिडे यांनी आपल्या कार्यकालात विद्यापीठात पहिली सायन्स काँग्रेस घेऊन विज्ञान-तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. पुढे डॉ. श्रीधर गुप्ते यांनी प्रथमच विद्यापीठात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयोग केला. त्यांच्या प्रयत्नामुळे पुणे विद्यापीठ कॉम्प्युटर सायन्सचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरले. पुढे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी विद्यापीठाच्या आवारात येऊन परम संगणकाचा शोध लावला. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या आवारात आयुका, आयसीएआर सारख्या संस्था स्थापन झाल्या. त्यामुळे विद्यापीठाची एक वेगळी प्रतिमा समोर आली. त्यानंतर डॉ.वसंतराव गोवारीकर यांच्यानंतर १९९८मध्ये मला कुलगुरुपदी काम करण्याची संधी मिळाली. विद्यापीठात पुन्हा सायन्स काँग्रेस घेण्याबरोबरच विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करता आले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला हेरिटेज दर्जा प्राप्त करून देता आला. त्यानंतर डॉ. अशोक कोळस्करांपासून ते सध्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सर्वांना बरोबर घेऊन विविध योजना व उपक्रम राबवून विद्यापीठाचा व संलग्न महाविद्यालयांचा, संस्थांचा विकास केला.
समाजाला बरोबर घेऊन विकास करण्याची विद्यापीठाची परंपरा आहे. यापुढेही विद्यापीठाने कार्यमग्न होऊन स्वत:चा चेहरा जपला पाहिजे. समाजापेक्षा आपण वेगळे नाही, असाच विचार करून नेहमी काम केले पाहिजे. तसेच विद्यापीठाने शेती, उद्योग, तंत्रज्ञान, समाजकार्य, संगीत अशा सर्व समाज घटकातील अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तींना बरोबर घेऊन विद्यापीठ विकासाच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचे मत विचारात घ्यायला हवे. कुलगुरूंनी त्यासाठी एक समिती स्थापन करून त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे.
विद्यापीठाने नावीन्याचा शोध घेत जुने ते सोने समजून जुन्या गोष्टींही बरोबर घेऊन वेगाने विकास करावा. सर्वांना विश्वासात घेऊन विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करावे, हीच माझी सदिच्छा.