पालेभाज्यांचे भाव तेजीत
By Admin | Updated: July 3, 2017 02:21 IST2017-07-03T02:21:01+5:302017-07-03T02:21:01+5:30
बाजारात आवक खूप कमी प्रमाणात होत असल्याने रविवारी कोथिंबीर, मेथीसह सर्वच पालेभाज्यांचे भाव तेजीत राहिले. तर फळभाज्यांमध्ये

पालेभाज्यांचे भाव तेजीत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बाजारात आवक खूप कमी प्रमाणात होत असल्याने रविवारी कोथिंबीर, मेथीसह सर्वच पालेभाज्यांचे भाव तेजीत राहिले. तर फळभाज्यांमध्ये आवक स्थिर राहिल्याने बहुतेक भाज्यांच्या भावात फारसा चढउतार झाला नाही.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी सुमारे १७० ते १८० ट्रक शेतमालाची आवक झाली. बाजारात सध्या फळभाज्यांची आवक माफक प्रमाणात होत आहे. रविवारी टोमॅटोच्या भावात काहीशी वाढ तर घेवड्याच्या भावात घट झाली. इतर भाज्यांचे भाव मात्र स्थिर राहिले. फळभाज्या स्थिर असल्या तरी पालेभाज्यांचे भाव काही दिवसांपासून तेजीत आहेत. जिल्ह्यात अनेक भागांत पावसाने ओढ दिली आहे. तर काही भागांत सुरूवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांना फटका बसला आहे. त्यामुळे सध्या बाजारात कोथिंबीर, मेथीसह सर्वच भाज्यांचे भाव तेजीत आहेत.
रविवारी बाजारात कोथिंबीर आवक केवळ १५ हजार जुडी आणि सटाणा येथील १० टेम्पो आवक झाली. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव शेकडा जुडीमागे १००० ते ३ हजार रुपयांपर्यंत गेले. मेथीची आवक ३५ हजार जुडी झाली असून शेकडा जुडीमागे १००० ते १५०० रुपये भाव मिळाला. शेपू, कांदापात, चाकवत, अंबाडी, मुळे, चुका या भाज्यांचे भाव ५०० ते १५०० रुपयांपर्यंत होते. पुढील काही दिवस पालेभाज्यांचे भाव तेजीतच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
आषाढी एकादशीनिमित्त रताळ्यांची मागणी वाढली
आषाढी एकादशीनिमित्त बाजारात विविध भागांतून रताळी आली असून मागणीही चांगली आहे. सध्या बाजारात करमाळा तालुक्यातून मांजरगाव, उंदरगाव यांसह बेळगावातून मोठी आवक होत आहे. रविवारी बाजारात ३ हजार गोणी रताळी आवक झाली. मागील वर्षीच्या तुलनेत आवक चांगली असल्याने भाव माफक आहे. गावरान रताळ्यांना २५ ते ३५ रुपये, तर बेळगाव रताळ्यांना १५ ते २० रुपये भाव मिळत आहे.
फळांना कमी मागणी
पावसामुळे फळांच्या मागणी घट झाली आहे. तसेच तोडणीही कमी प्रमाणात होत असल्याने काही फळांची आवक घटली आहे. रविवारी बाजारात लिंबाची सुमारे ७ हजार गोणी आवक झाली असून, प्रतिगोणी ५० ते १०० रुपये भाव मिळाला. कलिंगड, खरबूज, पपई या फळांना मागणी कमी झाली आहे.
फुलांची भाववाढ
फूलउत्पादक भागात काही प्रमाणात पाऊस पडत असल्याने फुलांना फटका बसला आहे. त्यामुळे काहीशा खराब फुलांची बाजारात अधिक आवक होत आहे. त्यामुळे चांगल्या फुलांना भाव मिळत असून बहुतेक फुलांचे भाव ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहे. रविवारी झेंडूला प्रतिकिलो २० ते ४०, गुलछडी ५ ते २० मोगऱ्याला १५० ते २५० रुपये भाव मिळाला.