शाळांमध्ये पैशांसाठी ‘आधार’
By Admin | Updated: November 2, 2015 00:49 IST2015-11-02T00:49:02+5:302015-11-02T00:49:02+5:30
शासनाच्या आदेशानुसार आधार कार्ड सेवा विनामूल्य असतानाही शाळेतून आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांमध्ये उघडकीस आला आहे

शाळांमध्ये पैशांसाठी ‘आधार’
सुवर्णा नवले, पिंपरी
शासनाच्या आदेशानुसार आधार कार्ड सेवा विनामूल्य असतानाही शाळेतून आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांमध्ये उघडकीस आला आहे. महापालिके चे आदेश नसताना मनमानी पद्धतीने काही महाभाग आधार केंद्रचालक आधार काढण्यासाठी शाळांमध्ये जाऊन स्वत:च आधार कार्ड काढून देत आहेत.
सध्या महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांचेच आधार कार्ड काढण्यासाठी महापालिकेने ठरवून दिलेल्या केंद्रचालकांना कामाचे आदेश दिले आहेत. शाळांमधील मुख्याध्यापकांना व शिक्षकांना आधार कार्ड विनाशुल्क मिळत आहे. विद्यार्थ्यांकडून पैसे आकारले जाणे, हा गुन्हा आहे. याबाबत माहिती असतानाही शिक्षक व मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत. खासगी शाळांमध्ये आधारसाठी शुल्क घेतले जाण्याचे गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. महापालिका शिक्षण प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
भोसरीतील स्पाइन रोड, क्र ांती चौक येथील एसपीजी इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड काढण्यासाठी पैसे घेतल्याचा प्रकार घडला आहे. शाळेतूनच आधार कार्ड काढून मिळेल, अशा नोटीस पालकांना पाठविण्यात आल्या होत्या. शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकही आधारसाठी शुल्क आहे, असे
सांगत आहेत, ही प्रशासनाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. ज्या
शाळांमध्ये शुल्क आकारले
जात आहे. त्या शाळांची चौकशी होण्याची गरज आहे.
तीन शाळांवर एकच आधार केंद्रचालक शाळांमध्ये जाऊन आधार कार्ड काढून देत आहे, तेसुद्धा शुल्क आकारून. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. मात्र, आधार केंद्रचालकांना चांगलीच मलई या माध्यमातून मिळत आहे. जे आधार केंद्रचालक प्रामाणिकपणे आधार काढण्याचे काम करीत आहेत. त्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान होत आहे. दैनंदिन ई-सुविधांची कामे सोडून ही मंडळी आधारसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये विनाशुल्क काम करीत आहेत. याचा फायदा काही चालकांनी शुल्क आकारून घेतला आहे. मात्र, आधार कार्डची होणारी लूट या अनागोंदी कारभाराकडे प्रशासनाचे लक्ष नाही.
शाळेतून आधारसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत माहिती घेतली जाईल. यापूर्वी ज्या शाळांमधून अशा तक्रारी आल्या आहेत, त्या शाळांमध्ये आधार मशिन बंद केल्या. मात्र, शाळांमध्ये आधारसाठी पैसे घेत असल्यास अशा शाळांनी आमच्याकडे तक्रारी कराव्यात. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.
- आशा उबाळे, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी