रेटारेटीमुळे निखळले बॅँकेचे लोखंडी प्रवेशद्वार
By Admin | Updated: November 13, 2016 02:55 IST2016-11-13T02:55:37+5:302016-11-13T02:55:37+5:30
देहूरोड-किवळे रस्त्यावरील देहूरोड दूरध्वनी केंद्राजवळील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पैसे भरणे, काढणे व नोटा बदली करून घेण्यासाठी नागरिकांनी सलग तिसऱ्या दिवशी

रेटारेटीमुळे निखळले बॅँकेचे लोखंडी प्रवेशद्वार
देहूरोड (जि. पुणे) : देहूरोड-किवळे रस्त्यावरील देहूरोड दूरध्वनी केंद्राजवळील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पैसे भरणे, काढणे व नोटा बदली करून घेण्यासाठी नागरिकांनी सलग तिसऱ्या दिवशी मोठी गर्दी केली होती. लावलेल्या रांगेत व मुख्य दरवाजात झालेल्या नागरिकांच्या रेटारेटीत बँकेचे बाहेरचे लोखंडी प्रवेशद्वार साच्यातून निखळल्याने जवळ उभ्या असलेल्या तीन-चार ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना मुका मार लागला. शनिवारी सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली. अखेर गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.
देहूरोड व किवळे - विकासनगर परिसरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. येथील बँक आॅफ इंडियाची शाखा सकाळी साडेदहाला उघडते. मात्र सकाळी सातपासूनच नागरिकांनी बँकेच्या परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बँकेत प्रवेश करण्यासाठी लोखंडी प्रवेशद्वार उघडल्यानंतर बँकेचा मुख्य जाळीचा दरवाजा व त्याच्या आतील लाकडी दरवाजा उघडून नागरिकांना बँकेत सोडण्यात आले होते. आतील इमारतीत जागा संपल्याने आलेल्यांच्या वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या होत्या. त्या वेळी बँकेचा सुरक्षारक्षक प्रवेशद्वाराजवळ नसल्याने मुख्य दरवाजाजवळ नागरिकांची गर्दी झाल्याने रेटारेटी होऊ लागली. या वेळी अर्धवट लावलेल्या सरकत्या लोखंडी प्रवेशद्वारावर अचानक दाब पडल्याने ही दुर्घटना घडली. (प्रतिनिधी)