बारामतीचा पारा ७.२ अंशांवर
By Admin | Updated: December 28, 2015 01:43 IST2015-12-28T01:43:57+5:302015-12-28T01:43:57+5:30
मागील चार दिवसांपासून बारामती शहरातील तापमानात कमालीची घट झाली आहे. शनिवारी (दि. २६) शहर आणि परिसरातील तापमानाची ७.२ अंश सेल्सिअस नोंद झाली.

बारामतीचा पारा ७.२ अंशांवर
बारामती : मागील चार दिवसांपासून बारामती शहरातील तापमानात कमालीची घट झाली आहे. शनिवारी (दि. २६) शहर आणि परिसरातील तापमानाची ७.२ अंश सेल्सिअस नोंद झाली. गेल्या वर्षभरातील हे नीचांकी तापमान आहे. या नीचांकी तापमानामुळे बारामतीकरांना हुडहुडी भरली आहे. मानवी आरोग्याबरोबरच फळबागांवर देखील विपरीत परिणाम झाला आहे.
वाढत्या थंडीमुळे सर्वत्र शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तर स्वेटर, मफलर, कानटोपी आदी थंडीपासून संरक्षण करणारे उबदार कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. सायंकाळी थंड वारे जाणवते. त्यानंतर सकाळी १० पर्यंत हवेत गारठा असतो.
अचानक वाढलेली थंडी लहान मुलांसाठी त्रासदायक ठरत आहे. लहान मुलांमध्ये या नीचांकी तापमानामुळे अॅलर्जी, ब्राँकायटीसचे प्रमाण आहे. तर काही मुलांना जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. पालकांनी लहान मुलांना बाहेरचे खाद्यपदार्थ देणे टाळावे, डिंक लाडू, खारकेसारख्या पौष्टीक अन्न घटकांचा अन्नपदार्थांमध्ये समावेश करावा. मुलांना उबदार कपड्यांचा वापर अत्यावश्यक आहे. लहान बालकांना सकाळी ११ नंतरच अंघोळ घालावी.
- डॉ. राजेंद्र मुथा, बालरोगतज्ज्ञ