बारामतीच्या गालिंदे कुटुंबावर काळाचा घाला
By Admin | Updated: June 23, 2014 01:31 IST2014-06-23T01:31:15+5:302014-06-23T01:31:15+5:30
लग्नाच्या वऱ्हाडातील इनोव्हा गाडी उलटून झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटुंबातील तीन जण ठार, तर दोन महिला जखमी झाल्या

बारामतीच्या गालिंदे कुटुंबावर काळाचा घाला
बारामती : लग्नाच्या वऱ्हाडातील इनोव्हा गाडी उलटून झालेल्या अपघातात बारामतीतील एकाच कुटुंबातील तीन जण ठार, तर दोन महिला जखमी झाल्या.
मृतांमध्ये वडील व दोन मुलांचा समावेश आहे. आज (रविवार) पहाटे साडेसहाच्या सुमारास कर्नाटकातील हुमदाबादनजीक मणीख्याल गावाजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघाताची माहिती कळताच बारामती परिसरात शोककळा पसरली. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील हॉटेल अक्षय गार्डनचे मालक राजेंद्र अरविंद गालिंदे (वय ५२), त्यांचे सख्खे बंधू प्रशांत अरविंद गालिंदे (वय ४८) व वडील माजी नगरसेवक अरविंद सदाशिव गालिंदे (वय ७६) या तिघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांची बहीण अमृता किरण सौदागर व सिंधू राजेंद्र गालिंदे या दोघी या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघातात गालिंदे कुटुंबातील ३ कर्ते पुरुष मृत्युमुखी पडले. इनोव्हा गाडी स्वत: राजेंद्र हेच चालवीत होते. डोळ्यांवर झोप आल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतर तिन्ही मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आले. शवविच्छेदन व जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या अपघाताची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. त्यांनी स्वत: लक्ष देऊन येणाऱ्या अडचणी दूर केल्या. (प्रतिनिधी)