बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, ते योग्य निर्णय घेतील : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 03:45 PM2024-02-17T15:45:19+5:302024-02-17T15:45:56+5:30

कुटुंबात एकटे पाडले जात असल्याच्या अजित पवार यांच्या आरोपावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा टोला लगावला आहे...

Baramatikar knows us for years, he will take the right decision: Sharad Pawar | बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, ते योग्य निर्णय घेतील : शरद पवार

बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात, ते योग्य निर्णय घेतील : शरद पवार

बारामती (पुणे) : भावनात्मक आवाहन आणि भावनिक राजकारण आमच्याकडून करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही ते करतच नाही. बारामतीकर आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे आम्हाला भावनात्मक आवाहनाची आवश्यकता नाही. पण विरोधकांची भाषणे हे काहीतरी वेगळं सुचवतात. त्याची नोंद बारामतीचे मतदार निश्चितपणे घेऊन योग्य तो निर्णय घेतील त्याची मला खात्री आहे. कुटुंबात एकटे पाडले जात असल्याच्या अजित पवार यांच्या आरोपावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा टोला लगावला आहे.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांचे आरोप खोडून काढले. पवार म्हणाले, उमेदवार कोणी असेल निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; पण संपूर्ण कुटुंबातील लोक एका बाजूला आहेत आणि मी फक्त बाजूला आहे याचा अर्थ लोकांना स्वतःच भावनात्मक करण्याचा व भावनिक राजकारण मांडून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो, असाही टोला पवार यांनी लगावला.

बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोणीही उभे राहू शकते. लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. गेली ५५ ते ६० वर्ष आम्ही काय केलं हे लोकांना माहीत आहे. बारामतीत उभा राहिलेल्या संस्था विद्या प्रतिष्ठान संस्था स्थापन होऊन सुमारे ५४ वर्षं झाली. कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था १९७१ साली स्थापन झाली. त्यावेळी आज आरोप करणाऱ्यांचे वय काय होते, याचे ‘कॅल्क्युलेशन’ त्यांनी केले तर त्यांच्या आणि लोकांच्याही लक्षात येईल. या प्रकारची भूमिका मांडणे कितपत योग्य आहे, असा सवाल पवार यांनी केला.

आव्हाडांनी काय बोलावं याचं मार्गदर्शन इतरांनी करू नये

राज्यात दोन पवारांच्यात जे अंतर पडले ते जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे. आव्हाड हे जयंत पाटील व सुप्रिया सुळे यांना बाजूला सारत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं याचं मार्गदर्शन इतरांनी करण्याची गरज नाही. आव्हाड यांच्यासंबंधी केलेल्या आरोपांचेही त्यांनी खंडण केले. मुंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये जो कालखंड गेला त्यापेक्षा किती तरी अधिक वर्षे आव्हाड हे पक्षासाठी काम करत आहेत. त्यांनी देश-राज्य पातळीवर काम केले. संस्थात्मक काम केले. महाराष्ट्राच्या विधिमंडळातही काम केले आहे. राज्य मंत्रिमंडळामध्येसुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी कोणतीही वेगळी भूमिका घेतली असे नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, याचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी मुंडे यांना लगावला.

Web Title: Baramatikar knows us for years, he will take the right decision: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.