बारामतीचा पाणीप्रश्न सुटणार
By Admin | Updated: October 9, 2016 04:17 IST2016-10-09T04:17:52+5:302016-10-09T04:17:52+5:30
शहरातील पाणीटंचाईची समस्या नवीन साठवण तलावामुळे सुटली आहे. जवळपास ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावामुळे टंचाईच्या काळातदेखील

बारामतीचा पाणीप्रश्न सुटणार
बारामती : शहरातील पाणीटंचाईची समस्या नवीन साठवण तलावामुळे सुटली आहे. जवळपास ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाणी साठवण तलावामुळे टंचाईच्या काळातदेखील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ पुरेल, इतका पाणीसाठा होत आहे. या तलावात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करून तालुक्यातील दुष्काळी गावांनादेखील याच तलावातील पाणी देणे शक्य झाले. तलावाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर दि. ११ रोजी केले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी दिली.
नगरपालिकेने यापूर्वी १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला. त्यानंतर जुन्या माती तलावाच्या जागेत ३५५ दशलक्ष लिटर क्षमतेचा तलाव २०१२मध्ये बांधण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी तलाव बांधून पूर्ण झाला. पाणीटंचाईच्या काळात पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन दिले. नीरा डावा कालव्यावर आधारित हा तलाव पूर्ण झाला. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ टळली होती. पिण्याच्या पाण्याबाबत बारामती शहर स्वयंपूर्ण झाले आहे. विहिरीचे पाणी ते अद्ययावत जलशुद्धीकरणाने युक्त साठवण तलावामुळे पाणीटंचाई दूर झाली आहे. यापूर्वी ७३ दशलक्ष लिटर क्षमतेचे साठवण तलाव होते; त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागे.
केंद्र शासनाच्या पायाभूत सुविधा विकास योजना, राज्य सरकारच्या सुजल निर्मल योजनेअंतर्गत पहिला १२७ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला.
त्यानंतर ३५५ दशलक्ष लिटरचा तलाव बांधण्यात आला आहे. त्यासाठी ४९ कोटी रुपये खर्च आला आहे. या तलावाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होईल.
नीरा डावा कालव्याचे आवर्तन साधारणत: ४५ दिवसांचे असते. त्यामुळे टंचाईच्या काळातदेखील सलग २ महिने बारामतीकरांना पाणी देणे शक्य झाले आहे. वाढीव हद्दीत जळोची पाणी योजना, खंडोबानगर, तांदूळवाडीच्या योजना आहेत. त्याचबरोबर माळेगावची पाणीपुरवठा योजनादेखील नगरपालिकेच्या ताब्यात येणार आहे. याशिवाय, बारामतीच्या सर्व भागासाठी पाणीपुरवठा बृहत् बारामती पाणी योजनेचा आराखडा केला आहे.
- योगेश जगताप;
नगराध्यक्ष