बारामती उपविभाग : १७.७५ टक्के पेरण्या
By Admin | Updated: July 7, 2015 02:48 IST2015-07-07T02:48:42+5:302015-07-07T02:48:42+5:30
बारामती उपविभागामध्ये खरीप हंगामाच्या १७.७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता; मात्र जूनअखेर

बारामती उपविभाग : १७.७५ टक्के पेरण्या
बारामती : बारामती उपविभागामध्ये खरीप हंगामाच्या १७.७५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जून महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाला होता; मात्र जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने समाधानकारक पेरण्या झाल्या नाहीत. येत्या दोन ते तीन दिवसांत बारामती उपविभागात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. खरीप वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.
बारामती कृषी उपविभागामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आदी तालुक्यांचा समावेश आहे. उपविभागाच्या शुक्रवारच्या (दि. ३) अहवालानुसार दौंड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५.३५ क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. तर बारामती तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ३८.५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मात्र सरासरीच्या तुलनेत अद्याप पेरण्या कमी आहेत. इंदापूर आणि पुरंदरमध्येही खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांत अनुक्रमे ८.८९ आणि ७.६८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.
बारामती, इंदापूर आणि पुरंदरमध्ये प्रामुख्याने खरीप हंगामात बाजरीच्या पेरण्या होतात. बारामती तालुक्यात बाजरीच्या ९१.६९ क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर इंदापूर आणि पुरंदरमध्ये ७.६९ व १०.३१ टक्के क्षेत्रावर बाजरीच्या पेरण्या झाल्या आहेत. बारामती तालुक्यातील जिरायती भागात प्रामुख्याने खरिपाचा हंगाम घेतला जातो.
मात्र या परिसरात जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आहे त्या पावसावर येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार पेरण्या झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. बारामतीच्या जिरायती भागात मागील चार वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती आहे. खरिपाच्या जीवावरच येथील अर्थकारण चालते. त्यामुळे हा खरीप हंगाम तरी हाताशी लागावा असा धावा येथील शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)
सुपे : सुपे परिसरामध्ये खरिपाच्या काही पेरण्या खोळंबल्या आहेत. तर, काही भागांत झालेल्या पेरण्या पावसाअभावी वाया जाण्याच्या भीती आहे. त्यामुळे येथील बाजार पेठेवरही परिणाम झाला आहे.
पंधरवड्यापूर्वी झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या सुमारे ६५ टक्के पेरण्या पूर्ण केलेल्या आहेत. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. या भागातील शेतकऱ्यांनी मागील पावसावर बाजरी, हळवी कांदा, जनावरांचा हिरवा चारा, मूग आदी पिके घेतली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्याला एकरी साडेतीन ते चार हजार रुपये मशागतीसाठी खर्च आला. पावसाअभावी हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
शासनाने खरीप पिकासाठी एकरी साडेतीन ते चार हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कोळोलीचे ज्येष्ठ शेतकरी संपतराव काटे, पानसरेवाडीचे यादव कुदळे यांनी केली आहे. बोरकवाडी येथील शेतकऱ्यांनी बाजरी, हळवी कांदा आदी पिके घेतली आहेत. मात्र, मागील आठवड्यापासून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे पिकांची ओल कमी होऊ लागली आहे. तसेच दररोज पडणाऱ्या कडक उन्हामुळे खरीप पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती बोरकवाडी येथील शेतकरी मधुकर बोरकर यांनी दिली.
बारामतीचे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांनी यामध्ये खरीप पिके वाचविण्यासाठी पिकांवर डीएएफ फवारणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.