बारामतीत भंगाराची दुकाने आगीत खाक

By Admin | Updated: December 7, 2015 00:16 IST2015-12-07T00:16:49+5:302015-12-07T00:16:49+5:30

बारामती शहरात सिनेमा रस्त्यालगत असणाऱ्या भंगाराच्या दुकानांना शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत दोन्ही दुकानांचे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

In Baramati, the shops of the store are burnt in fire | बारामतीत भंगाराची दुकाने आगीत खाक

बारामतीत भंगाराची दुकाने आगीत खाक

बारामती : बारामती शहरात सिनेमा रस्त्यालगत असणाऱ्या भंगाराच्या दुकानांना शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत दोन्ही दुकानांचे जवळपास १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, लगतच्या इमारती, दुकानांचे काही प्रमाणात नुकसान झाले. आग वेळीच आटोक्यात आल्याने अनार्थ टळला.
भाऊसाहेब माणिक मांढरे यांच्या अनिता स्कॅ्रप सेंटर, झुंबराबाई किसन दिवटे यांच्या स्क्रॅप सेंटरला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत मांढरे यांचे अंदाजे ९ ते १० लाख रुपये तर दिवटे यांचे ४ ते ५ लाख रुपये नुकसान झाले आहे. या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. फर्निचर, भंगार साहित्य गोळा करण्यासाठी गाडे, प्लॅस्टिक, केबल आदी साहित्य जळून खाक झाले आहे.
छत्रपती कारखाना, बारामती नगरपरिषद, माळेगाव कारखाना, बारामती एमआयडीसीसह विविध ठिकाणचे अग्निशमन दल, वाहने या ठिकाणी आग विझविण्यासाठी पोहोचली. त्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा मोठा अनर्थ ओढविण्याची भीती होती.
या आगीच्या झळांमुळे आसपासच्या इमारतींमधील पाईप जळून खाक झाले. तसेच, येथील एका दुकानाच्या काचा फुटल्या. मध्यरात्री अचानक लागलेली आगीची घटना समजल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यावसायिक मांढरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल ओ. के. सिताप करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: In Baramati, the shops of the store are burnt in fire