सदोष वायरजोडणीमुळे बारामती पालिकेला आग

By Admin | Updated: March 17, 2015 23:16 IST2015-03-17T23:16:12+5:302015-03-17T23:16:12+5:30

अंतर्गत वायरिंगच्या सदोष जोडणीमुळे बारामती नगरपालिकेच्या तळमजल्याला आग लागली, असा निष्कर्ष महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.

Baramati palekela fire due to faulty wire connection | सदोष वायरजोडणीमुळे बारामती पालिकेला आग

सदोष वायरजोडणीमुळे बारामती पालिकेला आग

बारामती : अंतर्गत वायरिंगच्या सदोष जोडणीमुळे बारामती नगरपालिकेच्या तळमजल्याला आग लागली, असा निष्कर्ष महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. जवळपास ४५ ते ४६ लाखांचे या आगीत नुकसान झाले आहे. बांधकाम व नगररचना विभागाचे जास्त नुकसान झाले. त्यामुळे जळालेल्या फायली परत मिळविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.
दि. ७ मार्च रोजी रात्री नगरपालिकेला भीषण आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वी तळमजल्याच्या डाव्या बाजूला शॉर्टसर्किट होत असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. १७ मिनिटांनंतर आगीचा भडका झाला. त्यानंतर कॅमेरादेखील जळून खाक झाला. विशेष म्हणजे, मुख्य सर्व्हर शाबूत राहिल्याने महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
नगररचना विभागात बांधकाम व्यावसायिकांनी, नागरिकांनी सादर केलेल्या फायलींची प्रत पुन्हा द्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. याशिवाय, नगररचना खात्याकडे नगरपालिकेच्या असलेल्या फायली मागवून घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, राज्य सरकार, विभागीय आयुक्त, नगरविकास विभाग आदी विभागांकडे केलेल्या पत्रव्यवहारांची प्रत मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तळमजल्याच्या डाव्या कोपऱ्यालगत रात्री ९ पासून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यात त्याचे चित्रण झाले आहे. याशिवाय, जवळपास १६ ते १७ मिनिटे शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या बाहेर पडत होत्या. रात्रीच्या वेळी कोणीही नसल्यामुळे प्रकार वेळीच लक्षात आला नाही. एकाच ठिकाणी अनेक वायरींचे जाळे असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली. सामान्य प्रशासन विभाग, रचना विभाग, लेखा विभाग, जागाभाडे, घरपट्टी आदी खात्यांचे नुकसान झाले.
नगरपालिकेत प्राप्त झालेल्या कागदपत्रांची आवक-जावक रजिस्टर उपलब्ध असल्यामुळे कोणत्या प्रकारची कागदपत्रे जळाली, याची माहिती मिळणे शक्य झाले आहे. महावितरणचे परिमंडल मुख्य कार्यकारी अभियंता इरवाडकर, शहराचे अभियंता देवकाते यांनी पाहणी केली होती. त्यानंतर महावितरणच्या निरीक्षकांना आगीच्या कारणांची माहिती घेण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी स्वतंत्रपणे पंचनामा केला होता. महावितरणच्या निरीक्षकांनी अंतर्गत सदोष वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट झाले; त्यामुळे आग लागली, असे कारण दिले आहे. भिजलेली कागदपत्रे असली तरी त्यातून माहिती उपलब्ध होत आहे. उर्वरित कागदपत्रे बांधकाम व्यावसायिक, नागरिकांकडून प्राप्त केली जाणार आहेत. ज्यांच्याकडे स्थळप्रत आहे, त्यांनी नगरपालिकेत त्याची एक प्रत सादर करावी, असे आवाहन नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. नगरपालिकेच्या या विभागातील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वेळीच आग आटोक्यात आणली. त्यामुळे एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना उर्वरित आग विझविण्यास अडचण आली नाही.
(प्रतिनिधी)

दुसऱ्या दिवशीच सर्व विभागांचे कामकाज सुरू
आग लागल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सर्व विभागांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभाग नगरपालिकेच्या स्थायी समिती विभागात सुरू करण्यात आला आहे. नगररचना मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या पहिल्या मजल्यावर, लेखा विभागदेखील याच विभागात सुरू करण्यात आला आहे. जागाभाडे विभाग पालिकेच्या पहिल्या मजल्यावर आणि घरपट्टी विभाग नगरपालिकेच्या समोरील जुन्या माहिती कार्यालयात सुरू करण्यात आले आहेत, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

Web Title: Baramati palekela fire due to faulty wire connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.