बारामती - मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आतापर्यंत सात आरोपी होते. त्यातील एक कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही सापडलेला नाही त्यामुळे पोलिस तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. अशात आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील स्व.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व धर्मीयांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चा स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख व यांचे बंधू धनंजय देशमुख सहभागी झाले आहेत. यादरम्यान स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही माध्यमांशी बोलतांना आरोपींना मदत करणाऱ्याला सुद्धा सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी केली. माध्यमांशी बोलतांना वैभवी देशमुख म्हणाली, माझ्या वडिलांची जी हत्या झाली. यानंतर आमचा कोणावर राग द्वेष नाही. पण ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, त्या आरोपींना ज्यांनी कोणी मदत केली. मग ते प्रशासनातील असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करावे. कारण जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये.' असं म्हणत तिने धनंजय मुंडेंचं नाव न घेता सहआरोपी करण्याची मागणी केली.तर स्व. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही फरार कृष्णा आंधळे पोलिसांना कधी सापडणार असा प्रश्न विचारत टीका केली. ही जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती. ती पोलिसांसोबत सर्रास वावरत होती 307 मध्ये फरार असणारे आरोपी हा कृष्णा आंधळे दोन वर्षापासून फरार आहे तरी तरीदेखील तो केज आणि धारूर पोलिसात त्याचा वावर होता. पोलिसांकडून त्याला अभय मिळत होतं. तो यंत्रणेला घाबरत नाही. तर सर्वसामान्यांना काय घाबरणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले होते. भाजपसह विरोधीपक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले. धनंजय मुंडे यांचा विधीमंडळ सदस्य पदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंनाही सहआरोपी करण्यात यावं असं म्हटलं जात आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही भाजपचीच मागणी असल्याचे म्हटलं होते.
'आरोपींना मदत करणारे प्रशासनातील असो किंवा इतर कोणी त्यांना सहआरोपी करावे'; लेक वैभवीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:45 IST