किरण शिंदे
पुणे : पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार हे जणू समीकरण झालं आहे. बारामती म्हणजे पवारांची राजकीय राजधानी असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही. पण याच बारामतीत नगरपालिकेच्या निवडणुकीत एक निकाल असा लागलाय ज्याने संपूर्ण शहराचं राजकारण ढवळून निघालंय. प्रभाग क्रमांक 20 मधून एका अपक्ष उमेदवाराने थेट राष्ट्रवादीला धक्का देत दणदणीत विजय मिळवला आहे. या अपक्ष उमेदवाराचं नाव निलेश इंगुले असं आहे. कोणताही पक्षाचा झेंडा नाही. तरीही मतदारांचा प्रचंड पाठिंबा त्याला होता. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 मधून निलेश इंगुले यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धूळ चारली. माजी नगरसेवक असलेले निलेश इंगुले यावेळी कोणत्याही पक्षाच्या आधाराशिवाय थेट अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. आणि निकालाच्या दिवशी त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच मोठा धक्का दिला.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1364670738451936/}}}}
निलेश इंगुले यांच्या या एका विजयाने राष्ट्रवादीची बारामतीतील अभेद्य मानली जाणारी पकड पहिल्यांदाच सैल झाल्याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे हा निकाल म्हणजे राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा तर नाही ना अशी ही चर्चा रंगली आहे. एकूणच बारामतीच्या या निकालाने शहराच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. आणि आगामी राजकीय समीकरणांमध्ये अपक्षांची ताकद दुर्लक्षित करता येणार नाही हेच या निकालानं दाखवून दिले आहे. अपक्षांचा हा विजय फक्त एका प्रभागापुरता मर्यादित राहणार का? की बारामतीच्या राजकारणात हा बदल मोठं वळण घेणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.