बारामती ‘बोअर’वर!
By Admin | Updated: April 5, 2016 00:54 IST2016-04-05T00:54:47+5:302016-04-05T00:54:47+5:30
भूगर्भातील पाण्याची पातळी खालवल्याने बारामती शहरात देखील पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

बारामती ‘बोअर’वर!
बारामती : भूगर्भातील पाण्याची पातळी खालवल्याने बारामती शहरात देखील पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. नीरा डावा कालव्याचे आवर्तन पिण्यासाठी सोडल्यामुळे शहरात नगरपालिकेचा पाणीपुरवठा दररोज होत आहे. परंतु, वाढीव हद्दीत अद्याप जलवाहिन्या पोहोचलेल्या नाहीत. त्या ठिकाणी विंधनविहिरींच्या (बोअरवेल) पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु, पाणीपातळी खालवल्याने त्याही बंद पडत आहेत. त्यामुळे
कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
बारामती शहरासह रुई, जळोची, बारामती ग्रामीण या उपनगरांमध्ये नागरीवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शहराच्या जुन्या हद्दीत पिण्याचे पाणी दररोज नगरपालिकेचे मिळते. परंतु, या उपनगरांमध्ये तांदूळवाडी, जळोचीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
परंतु, पाणी वापरण्यासाठी घेतलेल्या बोअरवेल्सच्या पाण्याचे स्रोत कमी झाल्यामुळे त्या बंद पडल्या आहेत. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामध्ये हरिकृपानगर, कारभारीनगर, जामदार रोडसह वाढीव हद्दीतील अनेक भागांतील खासगी बोअरवेल्स देखील बंद पडल्या आहेत. पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे हा त्रास सहन करावा लागत आहे.(प्रतिनिधी)मशिन चालकांची चंगळ
बोअरवेल्सचे पाणी कमी झाल्यामुळे त्याची पुन्हा खोदाई करण्यावर नागरिक भर देत आहेत. साधारणत: अडीचशे ते तीनशे फुटांपर्यंत बोअरवेल्स घेतले जातात. काही ठिकाणी तर पाचशे ते आठशे फुटांपर्यंत खोदाई केली जाते. तरी देखील भूगर्भातीलच पाण्याची पातळी खालावल्याने पाणी लागत नाही. मात्र, बोअरवेल्स खोदाई करणाऱ्या मालकांना पैसे देणे चुकत नाही. ५५ ते ७५ रुपये प्रतिफुटापर्यंत खोदाई आकारणी केली जाते. टँकरने पाणीपुरवठा अनेक भागांत केला जात आहे. त्याचबरोबर पूर्वी जिल्हा परिषदने केलेल्या हातपंपांची दुरुस्ती केली जात आहे. त्याचबरोबर नव्याने काही ठिकाणी बोअरवेल्स खोदण्याचे नियोजन आहे. परंतु, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याने नगरपालिका प्रशासनामार्फत पुढील कारवाई होत आहे. यात मजूरवर्ग सकाळी लवकर घराबाहेर पडत असल्यामुळे ५ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठिकठिकाणी बसवून त्यामध्ये टँकरचे पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.
- विक्रांत तांबे, नगरसेवक