बारामतीत कृत्रिम पाणीटंचाई!

By Admin | Updated: January 20, 2015 23:35 IST2015-01-20T23:35:11+5:302015-01-20T23:35:11+5:30

शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे.

Baramati artificial water shortage! | बारामतीत कृत्रिम पाणीटंचाई!

बारामतीत कृत्रिम पाणीटंचाई!

बारामती : शहरातील नागरिकांना २४ तास पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तब्बल ८ ते ९ महिन्यांनी जाग आली आहे. आता त्यासाठी तलावातील पाण्याचा उपसा केला आहे. त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली.
रविवारपासून नगरपालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे या कृत्रिम पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जावे लागले आहे. साठवण तलावाची गळती शोधण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पूर्वी मातीचे साठवण तलाव होते. त्यानंतर सिमेंट-काँक्रीटचा साठवण तलाव बांधण्यात आला. त्यासाठी जवळपास १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. १२८ दशलक्ष लिटर पाणी साठविण्याची क्षमता या तलावात आहे. या तलावात पाणी साठविल्यानंतर गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर साधारणत: मे २०१४ पासून गळतीचे प्रमाण वाढले. दररोज २५ ते ३० लाख लिटर पाणी साठवण तलावातून गळतीच्या रूपाने बाहेर पडत होते. संभाव्य पाणीटंचाईला तोंड देणे भाग पडू नये, यासाठी नगरपालिकेने ४ पंप लावून ज्या बाजूने पाणी साठवण तलावातून बाहेर पडत आहे. ते उचलून परत तलावात सोडले. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळातील पाणीटंचाई समस्या दूर झाली. यावर कायम स्वरुपी उपाययोजना करावी, यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये तलावातील साठवलेले पाणी अक्षरश: गटाराद्वारे सोडून देण्यात आले. हे पाणी साठवून ठेवण्याचीदेखील तसदी घेतली नाही. गळती शोधण्यासाठी प्राधिकरणाने तलाव रिकामा करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तलाव रिकामा करण्यात आला. नगरपालिकेने केलेल्या तक्रारीनंतर जीवन प्राधिकरणाचे अधिकारी फक्त पाहणी करून जात होते.
हा तलाव रिकामा केल्यामुळे रविवारपासून पाणीटंचाईचा सामना बारामतीकरांना करावा लागला. त्यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. सुदैवाने सोमवारी साखर कारखान्यांसाठी आवर्तन देण्यात आले होते. ते पाणी पुन्हा जुन्या खोदलेल्या साठवण तलावात साठवण्यात आले. त्यामुळे प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचे संकट टळले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

गळतीची दुरुस्ती करण्यासाठी तलाव रिकामा करून दिला आहे. साधारणत: फेब्रुवारी महिनाअखेर काम पूर्ण होईल, असे एमजीपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या जुना माती बंधाऱ्याच्या सिमेंट-क्राँक्रिटीकरणाचे काम थांबवून त्यामध्ये पाणी साठविण्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईला बारामतीकरांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी हे काम करण्यात येणार आहे. नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारे या कामासाठी खर्च करण्यात येणार नाही.
- सुभाष सोमाणी, नगराध्यक्ष

 

Web Title: Baramati artificial water shortage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.