सराईत गुंडाच्या अंत्यविधीची रॅली काढणाऱ्या बापू नायर टोळीतील म्होरक्यास बारामतीहून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:36+5:302021-06-09T04:12:36+5:30
पुणे : सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीची रॅली काढून दहशत पसरविणाऱ्या बापू नायर टोळीतील म्होरक्याला ...

सराईत गुंडाच्या अंत्यविधीची रॅली काढणाऱ्या बापू नायर टोळीतील म्होरक्यास बारामतीहून अटक
पुणे : सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीची रॅली काढून दहशत पसरविणाऱ्या बापू नायर टोळीतील म्होरक्याला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने बारामती येथून अटक केली.
कैलास महादेव माने (वय ३०, रा. गुलमोहर अपार्टमेंट, बालाजीनगर, सध्या रा. कैकाड गल्ली, भिगवण चौक, बारामती) असे त्याचे नाव आहे.
माधव वाघाटे यांच्या अंत्यविधी रॅलीत १५ मे रोजी सुमारे १०० ते १२५ दुचाकी वाहनांवरून लोक सहभागी झाले होते. त्यात कैलास माने, सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, रामा उमाप यांनी नेतृत्व करून रॅली काढून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे १०० जणांना अटक केली होती. त्या वेळी कैलास माने हा फरार झाला होता.
पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माने हा बारामती येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी बारामती येथे जाऊन कैलास माने याला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. माने हा बापू नायर टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खून १, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे एकूण ६ गुन्हे असून, मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.