बाप्पा मोरयाचा घोष, तरुणाईचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2015 02:25 IST2015-09-29T02:25:50+5:302015-09-29T02:25:50+5:30

रात्रीचे ११ वाजलेले. अलका चित्रपटगृहाच्या चौकात ही गर्दी झालेली. महापालिकेच्या स्वागत कक्षात महापौर दत्तात्रय धनकवडे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृहनेते बंडू केमसे, स्थानिक नगरसेवक

Bappa Moria Ghosh, Junglee Jolossa | बाप्पा मोरयाचा घोष, तरुणाईचा जल्लोष

बाप्पा मोरयाचा घोष, तरुणाईचा जल्लोष

पुणे : रात्रीचे ११ वाजलेले. अलका चित्रपटगृहाच्या चौकात ही गर्दी झालेली. महापालिकेच्या स्वागत कक्षात महापौर दत्तात्रय धनकवडे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, सभागृहनेते बंडू केमसे, स्थानिक नगरसेवक धनजंय जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती. ते सगळे आणि समोरचा जनसमुदाय सगळ्यांच्या तोंडात एकच गजर, एकच जयघोष, गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!
बाबू गेनू मित्र मंडळ, जिलब्या मारुती, श्रीमंत भाऊ रंगारी, कुंजीर तालीम मंडळ अशा अनेक मंडळांचे गणपती लक्ष्मी रस्त्यावर होते. अलका चित्रपटगृह चौकात मंडळ आले, की कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येत होते. महापालिकेच्या वतीने प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचा श्रीफळ देऊन गौरव केला जात होता. प्रत्येक मंडळाजवळ ढोलपथक होतेच. चौकात आले त्यांना खास वेळ दिला जात होता. त्यांनाही मग विशेष वादन करून दाखवण्याची खुमखुमी येई. त्यांच्याकडून ताशा आणि ढोलांचा तालबद्ध गजर झाला, की चौकाच्या चारी बाजूंना उभ्या असलेल्या भाविकांकडून टाळ्यांची मोठी दाद मिळत असे. अशा टाळ्या झाल्या की मग बाप्पा मोरयाचा जयघोष!
अनेक मंडळं चौकातून जात होती. त्यातही एकदा कुंजीर तालीम मंडळाच्या अरेरावी करीत असलेल्या काही कार्यकर्त्यांना थोडी पोलिसी चुणूक मिळाली. झाले, चौकात येताच त्यांनी थेट स्वागत कक्षात धाव घेत महापौरांकडेच गाऱ्हाणे
मांडले.
तिथे आलेल्या काही उत्साही कार्यकर्त्यांकडून लगेचच थांबा, मंडळ पुढे जाणार नाही, असे ओरडून सांगण्यात आले. मात्र नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी संयमाने परिस्थिती हाताळत ध्वनिवर्धकावरून एक आवाहन केले. पोलिसांनी थोडी काळजी घ्यावी, कुंजीर तालीम मंडळाचे सगळे पैलवान कार्यकर्ते त्यांच्यावर चिडले आहेत, असे म्हणत त्यांनी सगळ्यांना खूश करून टाकले. त्यामुळे वाढू शकणारा हा प्रसंग टळला.
दरम्यान, जमलेल्या सगळ्या भाविकांना प्रतीक्षा होती ती दगडूशेठ हलवाई व मंडईच्या शारदा गणेशाची. ही दोन्ही मंडळे कधी निघणार, याची विचारणा अलका चौकापासून ते थेट बेलबाग चौकापर्यंत होत होती. बरोबर साडेबारा वाजता अखिल मंडई मंडळाचा शारदा गणेश फुलांनी सजवलेल्या भव्य स्वराज्यरथातून बेलबाग चौकात अवतीर्ण झाला. या दुमजली रथावरचे फुलांचेच झेंडे, वरच्या भागातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा हे सगळेच आकर्षक होते. मिरवणुकीतील ढोलपथकांनी मिरवणूक दिमाखदार केली होती. नेहमीपेक्षा थोडा लवरकरच मंडईचा गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्याने सगळे वातावरण उत्साही झाले.
(प्रतिनिधी)

Web Title: Bappa Moria Ghosh, Junglee Jolossa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.