बारामतीतील बनवाडी-जराडवाडी गाव तहानलेलेच
By Admin | Updated: January 28, 2015 02:22 IST2015-01-28T02:22:20+5:302015-01-28T02:22:20+5:30
बारामती पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी २०१५ला जिल्हा नियोजनाखालील कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला होता.

बारामतीतील बनवाडी-जराडवाडी गाव तहानलेलेच
रविकिरण सासवडे, बारामती
बारामती पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी २०१५ला जिल्हा नियोजनाखालील कामांच्या सद्य:स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. मात्र, प्रत्यक्षात पूर्ण दाखवलेली कामे अपूर्ण असल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’च्या पाहणीत उघड झाली आहे. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यातही सुरू करण्यात आलेल्या कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तालुक्यातील बनवाडी, जराडवाडी, काळखैरवाडी, वडगाव निंबाळकर, गुणवडी, मेडद आदी गावांमध्ये या नवीन केलेल्या कामांमधून पाणीपुरवठा सुरू असल्याचे प्रसिद्ध केलेल्या अहवालात दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात येथे पाणीपुरवठा बंद आहे. तर काही ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. केवळ ठेकेदाराने दिलेल्या माहितीवर हा अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप बनवाडी, जराडवाडी येथील ग्रामस्थांनी केला आहे.
अहवालात दाखवण्यात आलेल्या योजनेचा लाभ बनवाडी १-२, बनवाडी गावठाण, पेरूचा मळा, पवारवस्ती आदी भागांचा समावेश आहे. ३४ लाख ८८ हजार रुपयांची ही योजना जानेवारी २०१२मध्ये पूर्ण करण्यात यावी, असे सांगितले आहे. मात्र, २०१५ साल उजाडले, तरी हे काम पूर्ण नाही. सध्या येथील ग्रामपंचायतीकडे फक्त तीन ते साडेतीन लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे अपूर्ण असलेले काम कसे पूर्ण होणार, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बनवाडी-जराडवाडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. येथील ग्रामस्थांना सध्या पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर जनावरांसाठी वाहनांद्वारे दुरून पाणी आणावे लागत आहे. येथील पाणीपुरवठा टाकी, जलवाहिनी, विहिरीवरील पंपाचा वीजजोड आदी कामे अपूर्ण आहेत. विहिरीच्या पाण्याचा उपसा नसल्याने पाणी दूषित झाले आहे. अहवालात येथील काम पूर्ण झाल्याचे आणि पाणीपुरवठाही सुरू असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून पाणीपट्टीही वसूल करण्यात येत आहे. पाणीपुरवठा सुरू नसताना आम्ही पाणीपट्टी का भरायची? असा संतप्त सवालही ग्रामस्थ विचारत आहेत.
ठेकेदाराने येथील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. अवघ्या अर्ध्या फुटावर जलवाहिनी गाडण्यात आली आहे. तसेच वीजजोड नसताना वीजजोड दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला महावितरणचे बीलही भरावे लागत आहे. येथील विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र, ठेकेदार आणि पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे बनवाडी जराडवाडी तहानलेलीच आहे. तसेच नियोजित कामामध्ये विहिरीच्या जवळ ७३ हजार रुपयांमध्ये ‘पंपहाऊस’ बांधण्यात येणार आहे. मात्र, ठेकेदाराने जागा नसल्याचे पाणी पुरवठा विभागाला कळवले आहे. त्यांनी पाहणी केली नाही. त्यामुळे संशय व्यक्त होऊ लागला आहे.
याबाबत येथील ग्रामस्थ शिवाजी जराड यांनी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडे माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती. मात्र, माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. अर्ज करून साठ दिवस उलटले, तरी माहिती मिळाली नाही.