आज बँका, पोस्ट आॅफिस बंद
By Admin | Updated: November 14, 2016 07:00 IST2016-11-14T07:00:02+5:302016-11-14T07:00:02+5:30
नोटा बंद निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शासनातर्फे शनिवारी व रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या

आज बँका, पोस्ट आॅफिस बंद
पुणे : नोटा बंद निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शासनातर्फे शनिवारी व रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, गुरू नानक जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुटी असल्याने सोमवारी (दि.१४ ) बँका व पोस्ट आॅफिस बंद राहणार आहेत. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना एक दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
काही किरकोळ घटना वगळता नागरिकांनीही कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. मात्र, सोमवारी पुणे शहरातील सर्व बँका बंद राहणार आहेत. शासन आदेशनुसार सुटीच्या दिवशीही बँका सुरू राहिल्या.
पोस्ट आॅफिस अधिकारी एफ.बी.सय्यद म्हणाले, की बँकांबरोबरच पोस्ट आॅफिस कर्मचा-यांनीही नागरिकांच्या सोईसाठी विविध ठिकाणी सेवा दिली. ससून रुग्णालयातील रुग्णांसाठी तत्काळ सुविधा उपलब्ध करून दिली.रविवारी वायसीएम हॉस्पिटलमधील रुग्णांसाठीही पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी नोटा बदलून देण्याची व्यवस्था केली होती. गुरूनानक जयंतीनिमित्त पोस्ट आॅफिस बंद राहणार आहेत.मंगळवारी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत सर्व पोस्ट आॅफिस सुरू होतील. आरबीआय कडून प्राप्त होणाऱ्या नोटांनुसार पोस्टाकडून नागरिकांना नोटाचे वाटप केले जाते. नोटा संपल्यानंतरच पोस्ट आॅफिस बंद केली जातात.
दरम्यान, पुणे पीपल्स को-आॅप़ बँकेने शहरातील सर्व शाखा सोमवारी ग्राहकांसाठी पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सर व्यवस्थापक सदानंद दीक्षित यांनी दिली़
(प्रतिनिधी)