बँका, एटीएमवर दिवसभर तुडुंब गर्दी
By Admin | Updated: November 16, 2016 03:05 IST2016-11-16T03:05:00+5:302016-11-16T03:05:00+5:30
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातुन रद्द केल्यानंतर सहाव्या दिवशी जिल्ह्यात बँक आणि एटीएम केंद्रावर तुंडुंब गर्दी होती.

बँका, एटीएमवर दिवसभर तुडुंब गर्दी
बारामती : ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातुन रद्द केल्यानंतर सहाव्या दिवशी जिल्ह्यात बँक आणि एटीएम केंद्रावर तुंडुंब गर्दी होती. सोमवारच्या सुटीनंतर मंगळवारी (दि १५ ) सकाळपासुनच नागरीक आणि ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. बारामतीत तर सायंकाळी ऊशीरापर्यंत रांगा कायम होत्या. तसेच पैसे काढण्यासाठी नागरीकांचा ओघ सुरुच होता.
नोटा बदलुन देण्यासाठी आज साडेचार हजार रुपये मर्यादा ठेवण्यात आली होती. तर ग्राहकांना एकावेळी दहा हजारांची रक्कम उपलब्ध करुन देण्यात आली. काही खासगी बँकांनी ग्राहकांना कमाल पाच हजार रुपये मिळणार असल्याचे सुचनाफलक लावले होते. तर एटीएम मधुन एका वेळी अडीच हजारांची रक्कम नागरीकांना मिळत होती. एटीएम मधुन रक्कम काढण्यासाठी काही ग्राहकांनी कमी गर्दी असलेली एटीएम केंद्र शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच एटीएम केंद्रांवर रांगा लावण्यात आल्या होत्या. अडीच हजारांची रक्कम मिळविण्यासाठी किमान दोन तास रांगेत थांबण्याची वेळ ग्राहकांवर आली.
बँकांसह पोस्ट कार्यालयातुन देखील नोटा बदलुन देण्यात येत आहेत. एका नागरीकाला अर्ज भरणा केल्यानंतर ४५०० रुपये देण्यात येत आहेत.मंगळवार (दि १५) पर्यंत पोस्ट कार्यालयातुन ५० लाखाहुन अधिक रक्कम ५०० आणि १००० च्या नोटांच्या बदल्यात देण्यात आली आहे, अशी माहिती पोस्टमास्तर सुरेश ताटे यांनी सांनी दिली. दरम्यान, नागरीकांच्या गर्दीमुळे दुपारी एक वाजता नोटा संपल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)