रात्री उशिरापर्यंत बँकांचे काम सुरू
By Admin | Updated: November 16, 2016 03:11 IST2016-11-16T03:11:43+5:302016-11-16T03:11:43+5:30
रात्रीचा १ वाजलेला, तरीही कार्यालयाचे सगळे दिवे सुरूच, आतमध्ये कर्मचाऱ्यांचे काम सुरू, महिला कर्मचारी बसलेल्या... बँक आॅफ इंडियाच्या कर्वे

रात्री उशिरापर्यंत बँकांचे काम सुरू
पुणे : रात्रीचा १ वाजलेला, तरीही कार्यालयाचे सगळे दिवे सुरूच, आतमध्ये कर्मचाऱ्यांचे काम सुरू, महिला कर्मचारी बसलेल्या... बँक आॅफ इंडियाच्या कर्वे रस्ता शाखेतील हे गेल्या तीन दिवसांतील चित्र आहे.
सुमारे ३० कर्मचारी, त्यात शिपाईही आले. सकाळी ९ ते रात्री असे उशिरापर्यंत काम करीत आहेत. त्यांच्या आसपासच्या काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा सकाळी सुरू होतात व दुपारनंतर कॅश संपली म्हणून बंद केल्या जातात. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्या सर्व ग्राहकांचा ताण या शाखेवर आला आहे. मात्र, त्याचाही काहीही तक्रार न करता सर्व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत सर्व कामांचा निपटारा करून पुन्हा सकाळी बरोबर साडेनऊ वाजता कामकाज सुरू करीत आहेत.
बँकेचे शाखा व्यवस्थापक निहार सत्पथी, वरिष्ठ प्रबंधक मिलिंद बेडेकर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू ठेवले आहे.
नोटा बदलून घेण्यासाठी वेगळी रांग, जमा करण्यासाठी वेगळी व पैसे काढण्यासाठी वेगळी रांग, अशी व्यवस्था करण्यात
आली आहे. माहिती देण्यासाठी म्हणून कार्यालयाच्या आवारातच एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. वृद्धांना प्राधान्य देण्यात येते. त्यांना बसण्यासाठी म्हणून शाखेच्या आवारात बाक ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)