‘बँड’ने ‘याड लागलं!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 00:12 IST2016-06-21T00:12:06+5:302016-06-21T00:12:06+5:30
आत्मिक आनंद आणि समाधान देणारी... दु:खाच्या अंधारातून बाहेर काढून सुखाचे किरण दर्शवणारी... संगीताविष्कारावर बेभान व्हायला लावणारी...

‘बँड’ने ‘याड लागलं!’
आत्मिक आनंद आणि समाधान देणारी... दु:खाच्या अंधारातून बाहेर काढून सुखाचे किरण दर्शवणारी... संगीताविष्कारावर बेभान व्हायला लावणारी... व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार प्रकट करणारी अनोखी जादू म्हणजे संगीत! तरुणाई आणि संगीत यांचं नातं अतूट आणि अपरंपार आहे. सध्याच्या तरुणाईच्या जाणिवा जागृत करणारं संगीत जॅझ, पॉप, सेमी क्लासिकल, सेमी वेस्टर्न, फ्युजन अशा विविध रूपांतून प्रकट होत आहे. उथळ ग्लॅमरच्या मागे न लागता मनाला स्पर्श करणाऱ्या आणि प्रत्येकाला आपलंसं वाटणाऱ्या संगीतातून पुण्यातील ‘म्युझिक बँड्स’नी तरुणाईला ‘सैैराट’ केले आहे.
सध्या शहरात मॉल संस्कृती चांगलीच लोकप्रिय आहे. तरुणाईशी संबंधित कोणताही इव्हेंट, संगीताच्या स्पर्शाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तरुण वय, तरुण मन आणि तरुण संगीत यांची जोडली गेलेली नाळ ओळखून पुण्यातील बँडसनी संगीताची विविध रुपे आणि तरुणाईला भावणाऱ्या धून तयार करुन जागतिक संगीताची झलक प्रतिबिंबित केली आहे. जॅझ, पॉप अशा पाश्चात्य संगीताची सध्या चलती असली तरी भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत संगीतप्रेमींच्या मनाला मोठ्या प्रमाणात भिडत असल्याचे मत बँडस चालकांनी नी व्यक्त केले.
‘थर्ड आय’ या रॉक बँडचा योगेश डीडी म्हणाला, ‘संगीताची अभिरुची अभिव्यक्त व्हावी, यादृष्टीने आम्ही संगीतप्रेमी ५-६ वर्षांपूर्वी एकत्र आलो आणि २०१३मध्ये बँडची स्थापना केली. आम्ही संगीतबद्ध करत असलेल्या गाण्यांमध्ये शास्त्रीय, सुगम, पाश्चात्य यांचा मिलाफ करण्याचा प्रयत्न केला जातो. काही बँड गाजलेल्या हिंदी गाण्यांचा पाया बसवून त्यावर वेगवेगळ्या धून तयार करतात. आम्ही स्वत:च्या रचना तयार करण्यावर जास्तीत जास्त भर देतो. भारतीय सैैन्याचे देशप्रेम, सीमेवर प्राणांची बाजी लावून देशाच्या सुरक्षेचा त्यांनी उचललेला वसा आणि त्यांच्या शौैर्याला सलाम करण्यासाठी २०१४ मध्ये ‘फतेह’ हे गाणी संगीतबद्ध केले होते. एमटीव्ही रोडीजसाठी या टीव्ही शोसाठी आम्ही ‘हौैसलों के परो में’ हे गाणे रचले आणि लोकप्रिय ठरले. ‘फकिरा’ तसेच ‘राहें’ या रोमँटिक गाण्यालाही तरुणाईने उचलून धरले. पाश्चात्य संगीताचा वेग आणि त्यातील धून संगीतप्रेमींना नक्कीच आकर्षित करते. मात्र, भारतीय संगीत प्रत्येकाच्या मनाला भिडते. त्यामुळे जागतिक संगीताची ओळख करुन देताना भारतीय संगीताची जादू कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो.’
जॅझ या जॉनरमध्ये ऱ्हिदम आणि मेलडीचा मिलाफ पहायला मिळतो. त्यामध्ये इंप्रूव्हायझेशनला संधी असल्याने आणि ठरावीक ओळींची पुनरावृत्ती होत असल्याने कोणालाही हे गाणे पटकन अपील होते. इंग्रजी गाण्यांमध्ये जॅझचा वापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र, मराठी आणि हिंदी गाण्यांमध्ये या जॉनरचा वापर फार कमी प्रमाणात होतो. हिंदी, मराठी गाणे आणि जॅझ यांचे मिश्रण संगीताला नवा आयाम देऊ शकते, असे सांगत, अभंग हे आपल्या संस्कृतीची देणगी असल्याने त्यातूनही संगीताची जादू होण्याची गरज आहे. - देवेंद्र