तोरण मिरवणुकीवरील बंदी यंदाही कायम
By Admin | Updated: September 11, 2014 04:19 IST2014-09-11T04:19:38+5:302014-09-11T04:19:38+5:30
नवरात्र उत्सवादरम्यान काढण्यात येणाऱ्या तोरण मिरवणुकीवरील बंदी यंदाही कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिली
तोरण मिरवणुकीवरील बंदी यंदाही कायम
पुणे : नवरात्र उत्सवादरम्यान काढण्यात येणाऱ्या तोरण मिरवणुकीवरील बंदी यंदाही कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिली. मिरवणुकीमध्ये डीजेच्या भिंती रचून आवाजाचा होणारा दणदणाट रोखण्यासाठी यापुढील काळात पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे माथूर यांनी सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणुकीचा ३३ तासांचा बंदोबस्त निर्विघ्नपणे पार पडला. यापार्श्वभुमीवर माथूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साताऱ्यामध्ये डीजेंच्या आवाजाने भिंत कोसळून तिघा जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे डीजेंच्या आवाजावर निर्बंध घालण्यावर पोलिसांकडून गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. डीजेंच्या या दणदणाटाला यापुढील काळात परवानगी दिली जाणार नसल्याचे माथूर यांनी स्पष्ट केले.
मागील दोन वर्षांमध्ये नवरात्रामध्ये तोरण मिरवणुका काढण्याचे फॅड मोठ्याप्रमाणात वाढले, त्यातून कार्यकर्त्यांमध्ये वादावादी, मारामाऱ्या होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे मागील वर्षी तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी कोणत्याही नवरात्र मंडळास तोरण मिरवणूक काढण्यासाठी परवानगी दिली नव्हती.
या वर्षीही तोरण मिरवणुकींना परवानगी देण्यात येणार नसल्याचे माथूर यांनी सांगितले. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना याबाबत सूचना देण्यात येणार
आहेत.
यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये टोल वाजविण्यास बंदी घालण्यात आली होती, त्याचे विशेष लक्ष देण्यात आले. काही मंडळांनी टोलबंदीवर शक्कल लढवून टोलचा आवाज रेकॉर्ड करून आणला होता. पोलिसांच्या ते लक्षात येताच त्यांनी ते संबंधित रेकॉर्डिंग साधने जप्त केल्याचे माथूर यांनी सांगितले. टोलबंदीच्या यशस्वीतेनंतर आता डीजे दणदणाट रोखण्यावर पोलिसांकडून भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)