उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी
By Admin | Updated: February 23, 2017 03:32 IST2017-02-23T03:32:56+5:302017-02-23T03:32:56+5:30
महापालिकेसाठी झालेल्या मतदानाची मोजणी गुरुवारी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी

उमेदवारांच्या मिरवणुकांवर बंदी
पुणे : महापालिकेसाठी झालेल्या मतदानाची मोजणी गुरुवारी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांना तसेच अन्य उमेदवारांनाही कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शहरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून निकालानंतरच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी संवेदनशील प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निकालानंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा केला जाणार आहे. या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या आणि विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वादावादी आणि भांडणे होण्याची शक्यता असते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरूनच विशेष बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
विजयी मिरवणुका तसेच वाद्य असलेल्या मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर फटाके वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शहरातील कसबा, नाना पेठ, भवानी पेठ, कात्रज, चंदननगर, खराडी, वारजे, सिंहगड रस्ता, कोथरूड, हडपसर, रामटेकडी, सय्यदनगर, बाणेर, बालेवाडी, लोहियानगर, कासेवाडी, चतु:शृंगी, मिठानगर कोंढवा, दत्तवाडी, पर्वतीदर्शन, धनकवडी आदी संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची विशेष गस्त राहणार आहे.
निवडणूक काळामध्ये दखलपात्र आणि अदखलपात्र असे एकूण ११९ गुन्हे दाखल झालेले आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ३गंभीर गुन्हे आणि १२ अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांसोबतच वाहतूक, गुन्हे शाखेच्या पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यांच्या मदतीला बॉम्बशोधक व नाशकची ६ पथके, आरसीपीची चार पथके देण्यात आली आहेत.