- लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेठाण : राज्यात सुरू असणारा शेतकरी संप आणि सुकाणू समितीच्या निर्णयानुसार बारा जूनपासून शेतकरी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्याबाबतचा इशारा बळीराजाने आज शासनव्यवस्थेला दिला.शेतकऱ्यांच्या वतीने सर्व तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार खेड तालुक्यात सोमवारी दिवसभर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जय प्रकाश परदेशी यांनी दिली आहे.चाकण येथे नुकत्याच झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. याप्रसंगी बाजार समिती सदस्य राम गोरे, काळुराम कड, अनिल देशमुख, जमीर काजी, विजय डोळस, माऊली शेवकरी, रमेश गोरे, अशोक बिरदवडे, मच्छिंद्र गोरे, दशरथ काचोळे, सिद्धार्थ परदेशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.सोमवारी सकाळी आठ वाजता तालुक्यातील शेतकरी खेड येथील राजगुरू यांच्या पुतळ्याला आणि आंबेडकर पुतळ्याला हार घालून त्यानंतर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे.मंगळवारी रास्ता रोको केला जाणार असून, त्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे.