बालभारती सुरू करणार शैक्षणिक चॅनल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:53+5:302021-02-05T05:01:53+5:30
पुणे : बालभारतीतर्फे वर्षभरात स्वतंत्र शैक्षणिक चॅनेल सुरू केले जाईल, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. ...

बालभारती सुरू करणार शैक्षणिक चॅनल
पुणे : बालभारतीतर्फे वर्षभरात स्वतंत्र शैक्षणिक चॅनेल सुरू केले जाईल, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. तसेच बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे.त्याचप्रमाणे येत्या १ फेब्रुवारीपासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा व अभ्यासाबाबत तज्ञ व विषय शिक्षकांकडून समुपदेशन करण्यात येईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संस्थेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त व किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात वर्षा गायकवाड बोलत होत्या. या वेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, समन्वयक विवेक गोसावी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, कवी इंद्रजित भालेराव उपस्थित होते.
गायकवाड म्हणाल्या, महापालिका, नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशासाठी रांगा लागतात,याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. तसेच राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात. शिक्षण विभागाने विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती व विषय शिक्षकांकडून या विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे.
---
कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवले. कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात जाऊन शिक्षण घेता आले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे यु-ट्युब-फेसबुक लाईव आदी साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन केले जाणार आहे. त्यासाठी ४२६ तज्ञ शिक्षक व ५९६ विषय तज्ञांची निवड केली आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
----
वर्षा गायकवाड यांनी वाचकांना विशेष भेट देत किशोरची वार्षिक वर्गणी ८० रुपयांवरून केवळ ५० रुपये करण्यात आली असल्याची घोषणा केली. तसेच वाचन संस्कृतीला चालना मिळावी,यासाठी बालभारतीने ग्रंथालय सुरू करावे,असे आदेश त्यानी दिले. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने चौथीचे वर्ग टप्प्या-टप्प्याने सुरू केले जातील, असे सांगितले. त्याचप्रमाणे शाळांमधील उपस्थिती वाढवावी व शालाबाह्य विद्यार्थी मुख्य प्रवाहात यावेत यासाठी स्वतंत्र मोहिम राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.