रेमडेसिविरची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:52+5:302021-05-15T04:10:52+5:30

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या तरुणाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी ...

The bail application of the illegal seller of Remedesivir was rejected | रेमडेसिविरची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

रेमडेसिविरची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या तरुणाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी हा आदेश दिला.

कृष्णा भास्कर हावणे (वय २५, रा. इंद्रायणीनगर, भोसरी. मूळ रा. खडकी, ता. वडवणी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. कोविड रुग्णासाठी रेमडेसिविर संजीवनी ठरत असताना त्याचा काळाबाजार ही समाजासाठी घातक गोष्ट असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.

भोसरी परिसरातील संजीवनी कॉलनी परिसरात २५ एप्रिल रोजी रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत, अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा याने कोविड साथीच्या आजाराचे औषध उपचारादरम्यान वापरण्यात येणारी औषधे कोणताही परवाना नसताना आपल्या जवळ बाळगली. तसेच, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी छापील किरकोळ किमतीपेक्षा अधिक दराने, खरेदी करणाऱ्याला कोणतेही बिल न देता, डॉक्टरांच्या चिठ्ठी तसेच विनाकोविड तपासणी अहवालाशिवाय विक्री करून फसवणूक करताना आढळून आला. गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी कृष्णा याने न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी विरोध केला. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्याच्या तपास अद्याप सुरू असून, त्याला जामीन दिल्यास त्याला कायद्याची भीती राहणार नाही. त्याला जामीन दिल्यास तो या स्वरूपाचा गुन्हा पुन्हा करण्याची दाट शक्यता असून, त्याविरोधात अद्याप दोषारोपपत्र दाखल करायचे असल्याने त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती अ‍ॅड. गेहलोत यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: The bail application of the illegal seller of Remedesivir was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.