आयुर्वेद हे पूर्वप्रतिबंधात्मक आणि पूर्णउपचारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:55+5:302021-02-05T05:16:55+5:30
डॉ.रामचंद्र देखणे : सुश्रुत जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वेदांमध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन ...

आयुर्वेद हे पूर्वप्रतिबंधात्मक आणि पूर्णउपचारात्मक
डॉ.रामचंद्र देखणे : सुश्रुत जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वेदांमध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोन पद्धती आहेत. आजार होऊ नयेत, यासाठी कशी जीवनशैली असली पाहिजे आणि आजार झाल्यास त्यावरील उपचार कसे करावेत, या दोन पद्धती आहेत. आयुर्वेद हे एकीकडे पूर्वप्रतिबंधात्मक आहे आणि त्याचबरोबर पूर्ण उपचारात्मक आहे. या दोन्ही पद्धतींमधून निर्माण होणारी उत्तम जीवनशैली आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन टेम्पल येथे सुश्रुत पुरस्कार प्रदान सोहळा झाला. डॉ. पाईल्स क्लिनिक व मंगल फाऊंडेशनच्या वतीने आयोजन केले होते. या वेळी आमदार चेतन तुपे, डॉ. शिवकुमार गोरे, डॉ. मिलिंद भोई, अॅड. प्रताप परदेशी, डॉ. कुणाल कामठे, डॉ शर्मिला कामठे आदी उपस्थित होते. सोहळयासाठी डॉ. युनूस सोलंकी, डॉ. सीमा पाटोळे, डॉ. सार्थक पवार, डॉ. सूर्यकांत मुरुड, प्रदीप मोरे, डॉ. देव यादव, डॉ. तुषार, सुनीता पाटेकर आदींचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमात डॉ. मधुभाई कोठिया, डॉ. सुभाष वर्ष्ने, डॉ. मीना शेख (पुणे) यांना सुश्रृत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. डॉ. कुलदीप कोहली, डॉ. गौरी बोरकर यांना आयुर्वेद आयकॉन आणि डॉ. राजेश गुप्ता, डॉ. महफुझूल्लाह काद्री यांना सुश्रृतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रोक्टोलॉजीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. व्यंकट भारद्वाज (हैद्राबाद), डॉ. प्रविण सहावे (नागपूर) यांनाही सन्मानित करण्यात आले.
चेतन तुपे म्हणाले, ‘‘आज अॅलोपॅथीला जास्त महत्त्व आले असले, तरी सुश्रुतसंहिता आणि चरकसंहितेच्या आधारावर आयुर्वेदशास्त्र पुढे जात आहे. आपल्याकडे आलेला रुग्ण पूर्ण बरा व्हावा, ही भावना ठेवून जो उपचार करतो, त्याच्या हाती यश निश्चित असते. रुग्णांसाठी धीराचे चार शब्द, उपचारातील मायेचा ओलावा हा मशिनमध्ये नसतो. त्यामुळे फॅमिली डॉक्टर ही पूर्वीपासूनची संकल्पना अतिशय चांगली आहे.