छेडछाडीविरोधात जागृतीसाठी हेल्पलाईन
By Admin | Updated: January 25, 2015 00:23 IST2015-01-25T00:23:14+5:302015-01-25T00:23:14+5:30
सध्या छेडछाडीच्या घटनांमुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच नोकरदार महिलांमध्येही घबराटीचे वातावरण आहे.

छेडछाडीविरोधात जागृतीसाठी हेल्पलाईन
पुणे : सध्या छेडछाडीच्या घटनांमुळे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच नोकरदार महिलांमध्येही घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, शहर महिला काँग्रेसतर्फे विद्यार्थिनी व महिलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन लवकरच सुरू करणार आहे, अशी माहिती शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सोनाली मारणे यांची शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मारणे यांनी नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले.
शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रथमच एक सुशिक्षित महिला कार्यकर्ता म्हणून पक्षाने मला संधी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा मानस त्यांनी या वेळी बोलून दाखविला.
प्रचारात सोशल मीडियाला महत्त्व आले आहे. महिला संघटन व मजबुतीसाठी त्याचा वापर मी करणार आहे. हे करीत असताना आॅनलाईन सभासद नोंदणीवर माझा भर राहील. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर पक्षातील महिला संघटना मजबूत करण्यावर भर राहील. त्यासाठी कार्यक्रमांची आखणी सुरू आहे.
काँग्रेस भवनाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुढील ६ महिन्यांपर्यंत शहरभर विभागनिहाय कार्यक्रम घेऊन पक्षाची ध्येयधोरणे व अजेंडा नागरिकांपर्यंत पोहोचविणार असल्याचेही मारणे यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
कामातून उत्तर देणार
४एक सुशिक्षित युवा कार्यकर्ता म्हणून महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे यांनी मला संधी दिली. त्यामुळे प्रस्थापितांमध्ये नाराजी आहे. या नाराजीतूनच माझ्यावर सध्या आरोप होत आहेत. या आरोपांना कामातूनच उत्तर देण्याचा माझा प्रयत्न आहे.