विद्यार्थी करणार पथनाट्यातून मतदानासाठी जागृती
By Admin | Updated: February 15, 2017 02:39 IST2017-02-15T02:39:44+5:302017-02-15T02:39:44+5:30
मतदानाचा हक्क बजावून प्रत्येकाने लोकशाहीला अधिक भक्कम करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत

विद्यार्थी करणार पथनाट्यातून मतदानासाठी जागृती
पुणे : मतदानाचा हक्क बजावून प्रत्येकाने लोकशाहीला अधिक भक्कम करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सर्वांनी उत्फूर्तपणे मतदान करावे, असा संदेश पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्याच्या माध्यमातून दिला जाणार आहे. येत्या १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून पथनाट्यांचे सादरीकरण केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले, ‘‘पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील विद्यार्थी येत्या १६ फेब्रुवारी
रोजी विद्यापीठातर्फे आयोजित पथनाट्य स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यातून सुमारे १० संघांची निवड केली जाणार आहे. एका स्वयंसेवी संस्थेने पूर्वीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती जमा केली आहे. त्यात खूप कमी टक्के मतदान झालेल्या भागांमध्ये जाऊन विद्यार्थी पथनाट्य सादर करून जागृती करणार आहेत.
तरुणाईला तसेच सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या उच्चभ्रू वर्गालाही मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांकडून केला जाईल. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड पालिका परिसरातील मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी आशा आहे, असेही देसाई म्हणाले.