अवसरी घाटात वाहतूककोंडी
By Admin | Updated: November 10, 2014 05:15 IST2014-11-10T05:15:12+5:302014-11-10T05:15:12+5:30
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पेठ-अवसरी घाटातील अवघड वळणावर मालट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक वळणावर उलटला

अवसरी घाटात वाहतूककोंडी
पेठ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पेठ-अवसरी घाटातील अवघड वळणावर मालट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक वळणावर उलटला. त्यानंतर या ट्रकच्या विरुद्ध दिशेने जाणारा ट्रक रस्त्यातच बंद पडला. त्यामुळे घाटता सुमारे सहा तास वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप करावा लागला.
पेठ-अवसरी (ता. आंबेगाव) घाटरस्ता हा आता अपघातांचा रस्ता म्हणून ओळखला जातो. नेहमीच्याच होणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघातांमुळे हा रस्ता वारंवार चर्चेत असतो. त्यातच आज पहाटे राजगुरुनगर बाजूकडून मालट्रक (यू.पी. ८० बी. टी ५६६०) मंचरच्या दिशेने येत होता. त्या वेळी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. त्यानंतर पोलिसांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले.
त्यानंतर दुपारी एक वाजता एक टेम्पो (एम.एच. ०४ एस ७३३३) राजगुरुनगरच्या दिशेने जात होता. ज्या ठिकाणी मालट्रक उलटला, त्याच ठिकाणाहून अवघ्या शंभर फूट अंतरावर टेम्पो बंद पडला. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत होत्या. टेम्पोचालकाने टेम्पो चालू करण्यासाठी खटाटोप केला. अखेर शेवटी एक तासाने टेम्पो सुरू झाला; मात्र त्यानंतर वाहतुकीची कोंडी सुटण्यास तब्बल दोन तासांचा कालावधी लागला. प्रचंड मनस्ताप करत प्रवासी व वाहनचालक भर उन्हात वाहतूककोंडीला सामोरे जात होते. नेहमीचेच होणारे अपघात व नेहमीचीच होणारी वाहतूककोंडी यामुळे प्रवासी व वाहनचालक संतप्त झाले होते. निरीक्षक मोहन जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत पोलीस फाटा घेऊन आले. त्या वेळी वाहनकोंडी सुरळीत होण्यास
मदत झाली. (वार्ताहर)