औंधचा वाहतूक प्रश्न मार्गी लावणार
By Admin | Updated: February 15, 2017 02:40 IST2017-02-15T02:40:10+5:302017-02-15T02:40:10+5:30
पिंपरी-चिंचवड व पुण्याला जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ओळखला जाणारा औंध परिसर नियोजनबद्धतेच्या अभावामुळे वाहतूककोंडीच्या जाळ्यात

औंधचा वाहतूक प्रश्न मार्गी लावणार
पुणे : पिंपरी-चिंचवड व पुण्याला जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा म्हणून ओळखला जाणारा औंध परिसर नियोजनबद्धतेच्या अभावामुळे वाहतूककोंडीच्या जाळ्यात अडकला आहे. महापालिकेत आमची सत्ता आल्यानंतर या भागातील वाहतूक प्रश्न मार्गी लावणार, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली.
औंध येथील भाजपा-आरपीआय आघाडीच्या अधिकृत उमेदवारांसाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते़ यावेळी सुनीता वाडेकर, विजय शेवाळे, अर्चना मुसळे एम. डी. पाटील, दिवाकर शेट्टी, सुरेश सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कार्यक्रमाला आमदार विजय काळे, परशुराम वाडेकर, मधुकर मुसळे, रोहन कुंभार, अमोल कांबळे, सौरभ कुंडलिक, तुकाराम गाडे, विजय शेवाळे, अनिल राक्षे, भीमराव गायकवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, की वाहतुकीच्या समस्येमुळे शहराजवळ असूनही औंधवासीयांना पुणे स्टेशनला जाण्यासाठी तासभर वेळ लागतो; पण आता मेट्रो, रिंगरोड, बीआरटीएस, एकात्मिक वाहतूक यांच्या माध्यमातून संपूर्ण वाहतूक सेवेचे बळकटीकरण करण्यावर आम्ही भर देणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणल्या आहेत. मात्र, पुणे महापालिकेत या योजना अमलात आणताना राजकारण झाले. या योजनांबाबत आमचे कौतुक करण्यापेक्षा टीका करण्यातच विरोधकांनी धन्यता मानली
ते पुढे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात स्थायिक झाले; पण त्यांना रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात महापालिका कमी पडली. यामुळे पुण्याचा विकास खुंटला. महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष असताना औंध येथे पाण्याची टाकी बांधायला म्हणून
पोलिसांची जागा उपलब्ध
करून द्यावी, यासाठी पाठपुरावा
केला होता. पण, आजतागायत महापालिकेने ही जागा उपलब्ध करून दिली नाही. गेल्या २५ वर्षांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता असूनही अनेक मूलभूत प्रश्नही सुटलेले नाहीत.